जगभरात काही ठिकाणी 21 ऑगस्ट आणि काही ठिकाणी 1 ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान आणि महत्त्व प्राप्त व्हावे असा हेतू हा दिवस साजरा करण्यामागे असतो.
प्रस्तुत लेख हा ज्येष्ठ नागरिक दिन हा मराठी निबंध (Senior Citizen’s Day Essay In Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत हा निबंध मांडण्यात आलेला आहे.
ज्येष्ठ नागरिक दिन निबंध मराठी | Senior Citizen’s Day Marathi Nibandh |
प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांच्या कर्तुत्वाला संबोधित करण्यासाठी हा दिवस निश्चित केलेला आहे.
ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी व लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होण्यासाठी 14 डिसेंबर 1990 रोजी हा निर्णय घेण्यात आला की 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जावा.
आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती, यामुळे वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे साधारणतः ज्येष्ठांचे तीन प्रकार असतात. 58 ते 65 वयोगट, 65 ते 75 वयोगट, आणि 75 आणि त्यापुढील वयोगट, अशा तीन प्रकारात ज्येष्ठांची विभागणी होते.
वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते, मग शारीरिक आणि मानसिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने ज्येष्ठांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण योजना लागू केलेल्या आहेत.
म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण होय. बहुतांश वेळा हे मनाला पटते देखील; लहान मुलांना जसे गोड पदार्थ हवेहवेसे वाटतात तसेच वृद्धांनाही ते प्रिय असतात. काहीवेळा जबाबदारी कमी झाल्यामुळे विरंगुळा म्हणून वृध्द लोक मजेशीर गोष्टींत रस घेऊ लागतात.
मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभले पाहिजे जेणेकरून शेवटची काही वर्षे त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुणपिढीने त्यांना सन्मानयुक्त जगवणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सांभाळ करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठ नागरिकांचे महत्व समजून घेतले पाहिजे, कारण ते आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात.
लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)
तुम्हाला ज्येष्ठ नागरिक दिन हा मराठी निबंध (Senior Citizen’s Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…