सध्या लोकसंख्या वाढ आणि प्रदूषण या समस्यांचा सामना मानवजात करत आहे. तसेच विज्ञान – तंत्रज्ञान विकास आणि जगण्यातील स्पर्धा देखील वाढलेली आहे. त्यामुळे मानवी स्वार्थ आणि गरजा पूर्ण करताना निसर्गाचा मात्र ऱ्हास होत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
जागतिक तापमानवाढ ही त्यापैकीच एक समस्या मागील दोन दशकांपासून सजीव सृष्टीला भेडसावत आहे. या समस्येची कारणे, परिणाम आणि उपाययोजना काय असतील याचा सारासार विचार जागतिक तापमानवाढ (Global Warming Essay in Marathi) या निबंधात करायचा असतो.
जागतिक तापमानवाढ – एक गंभीर समस्या निबंध | Jagtik Tapmanvadh Marathi Nibandh |
सध्या जागतिक तापमानवाढ ही पूर्ण जगभरात एक गंभीर समस्या बनलेली आहे. उष्ण कटिबंधात येणारे देश तर त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसत आहेत. तापमानवाढीचे दुष्परिणाम भयानक रूपाने जाणवत असल्याने त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक झालेले आहे.
प्रत्येकजण उष्णतेचा दाह सहन करत आहे. शहरी भागात तर खुल्या वातावरणात फिरताना सुद्धा दमछाक होत आहे. ऊनाची आणि प्रदूषणाची झळ ही आरोग्य बिघडवत असल्याने त्वचा रोग, डोळ्यांचे आजार, डोकेदुखी आणि उष्माघात अशा प्रकारचे आजार मानवाला जडत आहेत.
तापमानवाढ आणि प्रदूषणाचा परिणाम म्हणून ओझोन थर नष्ट होत आहे. ओझोनचा थर हा सूर्यापासून येणारी अतिनील किरणे थोपवून धरतो आणि पृथ्वीचे संरक्षण करतो. या थरात झालेल्या कमतरतेमुळे सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडत आहेत.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढलेले आहे. उष्णता आणि प्रदूषण कमी होण्यात उपयोगी ठरणारी झाडे तोडण्यात येत आहेत त्यामुळे तापमानात आणखीनच भर पडत आहे. आपण प्रत्येकवर्षी कित्येक मृत्यू हे उष्माघातामुळे झालेले पाहत आहोत.
तोडण्यात येणारी झाडे आणि जंगले यावर पर्यायी उपाययोजना नसल्याने सगळीकडे शुष्क वातावरण तयार झाले आहे. एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे वृक्षतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे आणि भयंकर अशा तापमानवाढीचा सामना आपल्याला करावा लागत आहे.
तापमानवाढीची कारणे समजून घेताना आपल्याला मानवी जीवन पद्धतीवर प्रश्न उभे करावे लागतील. आपण जेवढे प्रगत बनत चाललेलो आहोत तेवढाच निसर्गाचा मात्र ऱ्हास होत चालला आहे. आज तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रदूषण आणि वृक्षतोड या समस्या जगण्याच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेल्या आहेत.
वाहनांचा वाढता वापर, यांत्रिक प्रगती, औद्योगिक क्षेत्रात वाढ, जल – वायु – मृदा अशा प्रकारची प्रदूषणे आणि लोकसंख्यावाढ या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ झालेली आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपण फक्त भौतिक सुविधांचा विचार करत जगत आहोत.
भौतिक विकास साधताना निसर्गाचा विनाश होणे गरजेचे नाही याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला मूलभूत गरजा पूर्ण करताना देखील भयंकर स्पर्धेतून पार पडावे लागत आहे. त्यामुळे स्वार्थ वाढीस लागून कोणीही पर्यावरणाचा विचार करताना दिसून येत नाही.
तापमान वाढीची उपाययोजना म्हणून वृक्षतोड थांबवणे, वृक्ष लागवड करणे, वाहनांचा कमीत कमी वापर करणे, दळणवळण सुव्यवस्थित पद्घतीने घडवून आणणे अशा काही बाबी अंमलात आणता येतील. त्याबरोबरच लोकसंख्या नियंत्रण हे जर उद्दिष्ट ठेवले तर माणूस निसर्गावर आक्रमण करणारच नाही.
तापमानवाढ ही एक वातावरणात निर्माण झालेली अडचण आहे. ही अडचण दूर करण्याअगोदर आपल्याला तापमान वाढीची कारणे आणि लक्षणे समजून घ्यावी लागतील. त्यावर व्यवस्थित उपाययोजना आखून काम करावे लागेल. त्या कृतीसाठी खूप वर्षांचा कालावधी लागू शकतो याचीही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल.
तुम्हाला जागतिक तापमानवाढ – मराठी निबंध (Global Warming Marathi Essay) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…