गुढीपाडवा – मराठी निबंध | Gudhi Padava Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता सण गुढीपाडवा (Majha Avadta San Gudhi Padava Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात गुढीपाडवा सणाचे महत्त्व, ऐतिहासिक संदर्भ आणि तो कसा साजरा केला जातो अशा बाबींचे वर्णन केलेले आहे.

माझा आवडता सण – गुढीपाडवा निबंध | My Favourite Festival – Gudhi Padava Essay In Marathi |

गुढीपाडवा हा सण हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होत असते. गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला असतो. आजही महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात विविध प्रकारच्या परंपरा आणि प्रादेशिक संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा दिवस म्हणजे शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो. भारतीय परंपरेनुसार गुढी ही कोणत्याही क्षेत्रातील विजयाचे प्रतिक म्हणून उभारली जाते. घरातील सुख – समृध्दी व संपन्नता टिकून रहावी व वृद्धिंगत होत रहावी म्हणून देखील गुढी उभारण्याची प्रथा आहे.

गुढी पाडव्याला सर्वजण विविध प्रकारच्या वस्तू, वाहन अथवा दागिने खरेदी करतात. तसेच नवीन कामाला व व्यवसायाला देखील सुरुवात करतात. गुढी पाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून प्रचलित आहे. चैत्र महिन्यातील हा मुहूर्त म्हणजे एका मंगलमयी नववर्षाची सुरुवात असते.

द्वापारयुगात उपरीचर राजाने त्याला इंद्र देवाकडून मिळालेली कळक काठी इंद्रदेवाचा आदर म्हणून जमिनीत रोवली आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला काठीची पूजा केली. अन्य राजांनी तसेच सर्व प्रजाजनांनी देखील त्याचे अनुकरण केले आणि काठीला नवीन शालवस्त्र बांधून फुलांची माळ चढवून काठी घरासमोर उभी केली.

भारतात गुढीपाडवा हा सण “संवत्सर पाडवो”, “उगडी”, चेटीचंड अशा विविध नावांनी प्रचलित आहे. महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय नंदीध्वज, जतरकाठी, काठीकवाडी हे काठी-उत्सव साजरे केले जातात. काही मंदिरात आजही या दिवशी मानाची काठी फिरवली जाते.

भारतातील अनेक प्रदेशांत काठी पूजा करण्याची प्रथा आहे. पूर्वी धातूंचा वापर जास्त नसल्याने दैनंदिन जीवनात मानवासाठी काठीचा उपयोग जास्त होत असे. गुढी पाडव्याच्या दिवशी एक नवीन काठी वापरात आणली जाते. काठीचा वापर करण्याअगोदर तिला पुजली जाते.

गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक संदर्भ देखील आहे. शिव-पार्वतीचा विवाहदेखील याच दिवशी ठरला. पाडव्यापासून सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. तसेच चौदा वर्षांचा वनवास भोगून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता याच दिवशी अयोध्येत परत येतात. तेव्हा गुढी उभारून त्यांचे स्वागत केले गेले असा इतिहास आहे.

हिंदू धर्मीय लोक चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढी उभारतात. उंच बांबूपासून तयार केलेली काठी म्हणजेच गुढी होय. गुढीला रेशमीवस्त्र अथवा साडी गुंडाळतात. गुढीच्या टोकाला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे बसवले जाते.

गुढी ज्या ठिकाणी उभारायची ती जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढली जाते. गुढीला गंध, फुले आणि अक्षता वाहिल्या जातात. घरघरांत गोड जेवण बनवून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. सायंकाळी गुढीला हळद-कुंकू वाहतात आणि पूजा करून उभारलेली गुढी उतरवली जाते.

गुढीपाडवा हा सण म्हणजे सर्वत्र मांगल्याचे आगमन असते. वसंत ऋतुतील चैत्र महिन्याचा आरंभ गुढीपाडव्याने होत असतो. अत्यंत आल्हाददायक, उत्साहवर्धक आणि उल्हासपूर्ण अशा या सणाला सर्वत्र आनंदाची उधळणच असल्याने गुढी पाडवा हा माझा आवडता सण आहे.

तुम्हाला माझा आवडता सण – गुढीपाडवा हा मराठी निबंध (Majha Avadta San Gudhi Padava Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment