प्रस्तुत लेख हा शेतीचे महत्त्व (Shetiche Mahattva Marathi Nibandh) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आपले जीवनच मूलतः शेतीवर कसे काय अवलंबून आहे याचे स्पष्टीकरण या निबंधात दिलेले आहे.
शेतीचे महत्त्व – निबंध | Importance of Farming Essay In Marathi |
भारतात शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे आणि तोच जीवनाचा आधार देखील आहे. भारतीय उपखंडातील वातावरण हे शेतीस अत्यंत अनुकूल असल्याने अति प्राचीन काळापासून येथे शेती केली जाते. शेतीचे व्यवस्थापन आणि संवर्धन हे प्रत्येक पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित झाल्याचे दिसून येते.
शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकरी प्रत्येक हंगामात वेगवेगळी पिके घेऊन जमीन उत्तमरित्या कसत असतो. शेतीतून जे धान्य पिकवले जाते तेच आपल्याला अन्न म्हणून उपयोगी ठरत असते. शेतीमुळे जमिनीत नियमित खतांचा वापर होतो आणि जमीन वर्षानुवर्षे उपजाऊ राहते.
शेती ही पारंपारिक आणि आधुनिक पध्दतीने केली जाऊ शकते. बैल, शेती अवजारे, बैलगाडी, शेणखत अशी सामग्री वापरून पारंपारिक शेती केली जाते तर तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती केली जाते ज्यामध्ये ट्रॅक्टर, शेतीयंत्रे, रासायनिक खते अशी सामग्री वापरली जाते.
शेतीमुळे शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागलेले आहेत. तंत्रज्ञान विकासामुळे आधुनिक यंत्र सामग्री निर्मित झालेली आहे ज्यामुळे शेतीत खूप सारा वेळ वाचवला जाऊ लागला आहे. शेतीमुळे रासायनिक आणि सेंद्रिय खते, शेती अवजारे, कीटकनाशके, तुषार व ठिबक सिंचन या संबंधित उद्योगसुद्धा वाढीस लागलेले आहेत.
शेतीचे महत्त्व ओळखून आपल्याला काही गोष्टींची काळजीही घ्यायला हवी. रासायनिक खतांचा अतिवापर, फक्त नफा मिळवून देणाऱ्या पिकांचे उत्पादन, एकाच शेतातून वर्षभर उत्पन्न घेणे अशा बाबी नैसर्गिक दृष्ट्या घातक आहेत. त्यामुळे मातीचा पोत बिघडला जाऊ शकतो.
शेतीमुळे जमीन कसदार बनत असते. योग्य प्रकारे खतपाणी पुरवठा झाल्यास जमिनीतील पोषणमूल्ये वाढीस लागतात. तीच पोषणमूल्ये पिकांमध्ये सामावली जातात आणि आपल्या अन्नात समाविष्ट होतात. त्यामुळे आपले भौतिक जीवनच शेती आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीत अमुलाग्र बदल करणे गरजेचे नाही. नैसर्गिकरित्या शेती करून देखील उत्तमोत्तम पद्धतीचे पिक आपण उत्पादित करू शकतो. त्यासाठी शेतीला फक्त आर्थिक उत्पन्नाचे साधन न मानता अन्नाची उपयोगिता आणि गुणवत्तेनुसार आपल्या जीवनाचा मूलभूत आधार मानायला हवे.
सध्या भारत देशात लोकसंख्या जास्त असली तरी शेतीमुळे येथे अन्नधान्याचा कधीच तुटवडा भासत नाही. शेतीचे संस्कार इथल्या प्रत्येक नागरिकास उपजतच मिळत असतात. शेती हा आपणांस पूर्वजांपासून मिळालेला एक अनमोल वारसा आहे त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले काम नाही तर आपली जीवनशैलीच आहे.
तुम्हाला शेतीचे महत्त्व हा मराठी निबंध (Shetiche Mahattva Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…