लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण | Marathi Bhashan

प्रस्तुत लेख हा लालबहादुर शास्त्री (Lal bahadur Shastri Speech In Marathi) यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषण आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे हे भाषण अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारपूर्वक मांडलेले आहे.

लालबहादूर शास्त्री भाषण मराठी | Lal bahadur Shastri Marathi Bhashan |

“जय जवान जय किसान” ही घोषणा देऊन सर्व देशवासीयांचे बळ सेनादलामागे उभे करणारे, युद्धात पाकिस्तानला खडे चारुन भारताचा मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी, विनयशील, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

उत्तर प्रदेशमधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात दोन ऑक्टोबर 1904 रोजी लाल बहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. शारदा प्रसाद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शास्त्रींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्वज्ञान या विषयात “शास्त्री “ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव बनून लालबहादूर शास्त्री भारतभर विख्यात झाले.

राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला. ऐन तारुण्यात त्यांनी खूप पैसे मिळवून ऐष आरामात राहण्यापेक्षा देशसेवेला वाहून नेण्याचे ठरविले. भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले.

शास्त्रींनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मधील दांडीयात्रा,1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘लाल बहादूर शास्त्री’ होय.

“मूर्ती लहान पण कीर्ती महान” या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते. आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी सामान्य लोकांची भावना समजून घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचे मित्रच बनले.

अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे गृहमंत्री, वाणिज्य मंत्री, रेल्वेमंत्री, म्हणून काम करताना त्यांच्या सचोटीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले.

शास्त्रींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. अशा विनयशील व्यक्तीच्या मागे त्यांचे गुरु महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. शास्त्री नेहमी म्हणत असत की कठोर मेहनत ही प्रार्थनेसमान आहे. अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.

तुम्हाला लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण (Lal bahadur Shastri Speech In Marathi) आवडले असल्यास तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा… धन्यवाद!

Leave a Comment