स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Marathi Bhashan |

प्रस्तुत लेख हा स्वच्छता दिन – मराठी भाषण (Swacchata Din Marathi Bhashan) आहे. या भाषणातून स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट होते. विद्यार्थ्यांना भाषणासाठी प्रस्तुत विषयाचे लिखाण आणि पाठांतर अत्यंत उपयुक्त ठरेल.

स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Speech In Marathi |

चला करूया आपण परिसराची स्वच्छता,    
घेऊया न कचरा करण्याची दक्षता,
ठेवूया परिसर नेहमी योग्य,
तरच मिळेल निरोगी आरोग्य!

स्वच्छता हे असे काम नाही जे पैसे कमवण्यासाठी केले जाऊ शकेल, ही तर चांगली सवय आहे जी आपण लावून घेतली तर आपल्याला एक निरोगी आणि स्वस्त जीवन जगण्यास मदत होईल.

जगण्यात स्वच्छता हा गुण उतरवण्यासाठी एका मोठ्या जबाबदारीच्या रूपात प्रत्येकाने या कार्याचे अनुकरण करायला पाहिजे. अशा स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर या दिवशी स्वच्छता दिन साजरा केला जातो.

स्वच्छता दिनी संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये आपले घर, परिसर, शाळा, इतर शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि संस्था अशी ठिकाणे स्वच्छ करण्याचा उपक्रम असतो. विविध शाळांमध्ये विद्यार्थी स्वच्छता जागृतीसाठी फेरी देखील काढतात.

स्वच्छता दिनी भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, कला क्रिडा स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये सर्व कार्यक्रमांचा प्रमुख विषय “स्वच्छता” असतो. त्या सर्व स्पर्धांद्वारे स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले जाते.

स्वच्छता ही कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही. आपल्याला निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही अत्यंत गरजेची सवय आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात स्वच्छता अंगी बाळगलीच पाहिजे.

स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवनशैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने ही सवय लावून घेतलीच पाहिजे. स्वच्छता ही समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी स्वच्छता हेच ध्येय मानले पाहिजे आणि त्याचे महत्त्व व गरज समजून घेतली पाहिजे.

समाजात स्वच्छता नसल्याने गंभीर परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. अस्वच्छ परिसरामुळे कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने समोर येऊ लागली आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच पण व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग राहिले पाहिजे.

आपले मन स्वच्छ तर आपले घर स्वच्छ,  आपले घर स्वच्छ तर आपला परिसर स्वच्छ!

या उक्तीप्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारी  स्वतःपासून सुरू करावी लागेल. त्यासाठी “मी स्वतः परिसर अस्वच्छ ठेवणार नाही” असा प्रण प्रत्येकाने करायला हवा. स्वच्छता दिनी प्रत्येकाने संकल्पशील बनुयात आणि म्हणुयात…

झाडू असेल प्रत्येकाच्या हाती,   
करूया आपल्या परिसराची प्रगती,
होईल मग स्वच्छ भारताची निर्मिती,
कारण स्वच्छता हीच खरी संपत्ती!

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

तुम्हाला स्वच्छता दिन मराठी भाषण (Swachhata Din Marathi Bhashan)
आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment