पाण्याचा मानवास आणि इतर सजीव सृष्टीस असलेला उपयोग पाहता आपणास पाण्याचे महत्त्व समजते. त्यामुळे पाणी नसते तर… अशी कल्पना केल्यावर काय घडू शकते? याचा विस्तार “पाणी नसते तर” या मराठी निबंधात (Pani Naste Tar Marathi Nibandh) करायचा असतो.
पाणी नसते तर निबंध मराठी | Pani Naste Tar Marathi Essay |
सकाळी आमच्या घरी एक तास उशीरा पाणी आले. तेव्हा सर्वजण चिंतेत होते. सर्व कामे त्यामुळे आज उशिराच झाली. त्या चिंतेतून मुक्तता झाल्यावर आणि सर्व कामे आटोपल्यावर माझ्या मनात सहज एक विचार डोकावून गेला, जर पाणीच नसते तर…
मानवासाठी आणि निसर्गात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पृथ्वीवर आणि आपल्या शरीरात सुद्धा जवळजवळ ७० टक्के पाणी आहे. पृथ्वीवर एवढा पाण्याचा साठा आणि त्यामुळे जिवंत असलेले अस्तित्व हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
पाणी नसते तर झाडे, पशुपक्षी, लहान मोठे सजीव जगूच शकले नसते. निसर्ग पूर्ण बहरात आलाच नसता. निसर्ग अस्तित्वात राहण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. वन्यजीवन तसेच मानवी जीवनसुद्धा पाण्यामुळेच अस्तित्वात आहे.
माणूस जसजसा विकसित होत गेला तसतसा पाण्याचा उपयोग अत्यंत विशिष्ट प्रकारे करू लागला. घर आणि परिसर स्वच्छता, शरीर स्वच्छता, इतर वस्तूंची स्वच्छता या सर्व कामांसाठी पाण्याचा वापर होऊ लागला.
एका दिवसात आपल्याला पिण्यासाठी एक ते दोन लिटर पाण्याची आवश्यकता भासते. जे अन्न आपण खातो, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा वापर होतच असतो. जर पाणीच नसते तर मनुष्याची भूक आणि तहान या बाबींची पूर्तता झालीच नसती.
पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे, असा जैविक इतिहास आहे. इतर ग्रहांवर पाणी नसल्यानेच तेथे जीवन विकसित होऊ शकलेले नाही. त्यामुळे पाणी हेच जीवन आहे अशी उक्ती तयार झाली आहे.
पाण्याची उपलब्धता असल्यानेच बाष्पीभवन घडून पाऊस पडत असतो. पाणी नसतेच तर पाऊससुद्धा पडला नसता. मानवास शेती करणे अशक्य झाले असते. पाणी नसतेच तर पृथ्वीवर असलेले पाण्याचे विविध प्रकारचे स्वरूप स्थायू, द्रव आणि वाफ हे अनुभवास आलेच नसते.
अशा सर्व प्रकारचा विचार करून झाल्यावर मला जाणवले की पाणी हे जपून आणि काळजीपूर्वक उपयोगात आणले पाहिजे. सर्वांनी पाण्याचे महत्त्व आणि गरज ओळखून पाण्याचा अनावश्यक गैरवापर टाळावा, कारण पाणी नसतेच तर पृथ्वीवरचे भौतिक अस्तित्वच शून्य झाले असते.
तुम्हाला पाणी नसते तर हा मराठी निबंध (Pani Naste Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…