दिवाळीचा गृहपाठ | माझा दिवाळीचा अभ्यास | My Diwali Homework

माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आहे परंतु गृहपाठ हा शब्द मला नेहमीच आठवणीत राहतो. त्यामध्ये दिवाळीतील गृहपाठ म्हणजे करणे किंवा न करणे हा निर्णय घेण्यातच दिवाळीची सुट्टी संपून जायची.

दिवाळीतील गृहपाठ थोडा दिला तर ठीक! पूर्ण 15 ते 20 दिवस लिहीत बसलो तरी पूर्ण होऊ शकणार नाही एवढा अभ्यास देऊन शिक्षक आपले काम करून जायचे. आम्हाला तर धक्क्यावर धक्के बसत असायचे कारण प्रत्येक विषयाचा अभ्यास लिहून घेण्यातच वहीची दोन ते तीन पाने संपलेली असायची.
दिवाळी सण सुरू होण्याअगोदर 5 – 6 दिवस सुट्टी सुरू व्हायची. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन करून आम्ही मोकळे!

पहिले एक दोन दिवस अभ्यास होईल तेवढं ठीक!नंतरचे दिवस म्हणजे किल्ला बनवणे, नवीन कपडे खरेदी, फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी बाजार, आकाश कंदील, अशा कितीतरी गोष्टींनी दिवस भराभर निघून जायचे.

अभ्यासाचे नियोजन आता पुढे ढकलले जायचे. आता अभ्यास दिवाळी झाल्यानंतर! दिवाळीतील फुल्ल धमाल करताना मात्र आमच्या वर्गातील मुली आम्हाला नेहमी काहीतरी अपराध करत असल्याचे जाणवून द्यायच्या. कारण त्यांना नियमित अभ्यास पूर्ण करणे म्हणजे सोप्पी गोष्ट वाटत होती आणि आम्हाला असे वाटायचे की अभ्यास केला तर खेळणे आणि मज्जा होणार नाही.

आता सुट्टीच्या शेवटच्या पाच सहा दिवसात अभ्यास सुरू केला तरी तो पूर्ण होणे अशक्यच! कारण खेळणे आणि मौजमजा करणे याची सवयच लागून गेलेली असायची. तरीही जड अंतःकरणाने केलेले गृहपाठ अजुन आठवतात.

एक प्रसंग नेहमी मला आठवतो. इयत्ता चौथीत असताना माझा दिवाळीचा अभ्यास दरवर्षीप्रमाणे पूर्ण नव्हता. त्यावेळी वर्गातील पहिला दिवस आणि मी तर पुरता घाबरलो होतो. आमच्या वर्ग शिक्षकांनी “अभ्यास दाखवा” असे बोलताच मला तर घामच फुटला.
        
वर्गातील इतर मुले माझ्याकडे बघून पुरती मज्जा घेत होत्या. शेवटी माझा मित्र विजय माझ्या कामी आला. शिक्षक गृहपाठ पाहताना कोणत्याही पेनाचा शेरा देत नव्हते त्यामुळे विजयची वही मीही दाखवणे साहजिकच होते. मी तसे केलेही परंतु शिक्षक ते शिक्षकच! मला वाटले होते की शिक्षकांना कळणार नाही. ते तेव्हा काही बोलले नाहीत पण सर्वांचा अभ्यास तपासून झाल्यावर मात्र मला पुढे घेऊन जो माझा अपमान केला तो विसरणे म्हणजे अशक्यच!

मला विजयची वही देऊन काही दिवसांची मुदत देण्यात आली आणि गृहपाठ पूर्ण करण्यास सांगितला. हा प्रसंग जेव्हा जेव्हा “दिवाळीचा अभ्यास” असेल तेव्हा तेव्हा आठवतोच! आजही आठवतो…

Leave a Comment