प्रस्तुत लेख हा सावित्रीबाई फुले – मराठी निबंध
(Savitribai Phule Essay in Marathi) आहे. या निबंधात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
सावित्रीबाई जोतीराव फुले – निबंध | Savitribai Phule Marathi Nibandh |
ज्ञानज्योती, आद्य शिक्षिका, महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून स्त्री शक्तीला समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले. महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्यात देखील सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा होता.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीरावांनी स्वतः शिक्षित होऊन सावित्रीबाईंना देखील शिक्षण दिले.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांनी जातीयता, अनिष्ट रुढी – परंपरा आणि निरक्षरता या समाजाला घातक ठरणाऱ्या बाबींचा दाह सहन केला होता. त्यासाठी समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आजीवन समाजसेवेचे व्रत हाती घेतले.
कर्मकांड आणि मानवतेविरूध्द असणाऱ्या रुढी परंपरांना दूर करायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, अशी जाण ठेवून महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. तेथे सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम पाहिले.
इ. स. १८४८ ते १८५२ पर्यंत एकूण १८ शाळांची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली. त्यावेळी १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान देण्याचे देखील जाहीर केले.
फुले दाम्पत्याने इ. स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृह सुरू केले. केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप कामगार नेते नारायण लोखंडे यांनी घडवून आणला. त्यामागे सावित्रीबाईंचे सहकार्य आणि प्रेरणा त्यांना लाभली होती.
विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला शिक्षण दिले व त्याला डॉक्टर बनवले. जुलै १८८७ मध्ये जोतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची सेवा केली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिरावांचे दीर्घ आजारात निधन झाले.
इ. स. १८९६ – ९७ दरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ आली होती. ह्या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव जात होता. ही समस्या समजून घेऊन सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला.
संपूर्ण आयुष्यात अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या सावित्रीबाई प्लेग विरोधात झुंज देण्यात अयशस्वी ठरल्या आणि १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्य शिक्षिका, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्व देशवासीयांतर्फे विनम्र अभिवादन!
तुम्हाला सावित्रीबाई फुले हा मराठी निबंध (Savitribai Phule Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा..