मराठी भाषेचे भविष्यात काय महत्त्व असू शकेल, अशा आशयाचा मराठी भाषेचे भवितव्य हा मराठी निबंध (Marathi Bhasheche Bhavitavya Marathi Nibandh) प्रस्तुत लेखात स्पष्ट करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना या निबंधाचा नक्कीच लाभ होईल.
मराठी भाषेचे भवितव्य/भविष्य – मराठी निबंध | Marathi Bhasheche Bhavitavya Marathi Nibandh |
सध्याचे आधुनिक युग पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अत्यंत वेगाने विकास आणि प्रसार झालेला आहे. दैनंदिन जीवन तसेच शिक्षण हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञानाने व्यापले गेले आहे. त्यामध्ये भाषा आणि अभिजात भाषिक साहित्याचा कोठेही उल्लेखसुद्धा आढळत नाही.
कोणतीही भाषा पुढच्या पिढीत संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या भाषेतील साहित्य! मराठी साहित्य आणि ग्रंथ दालन किती जण पारखून आहेत. मराठी लेखक किती जणांना परिचित आहेत. ही झाली तरुणाई आणि वृद्ध लोकांची स्थिती! लहान मुलांच्या विकासात तरी किती प्रमाणात मराठी भाषा लिहली आणि वाचली जाते?
शिक्षण सुरू होताना जर मराठी भाषेचा संबंध आला नाही तर मराठी भाषेवरील प्रेम जागृत होणारच नाही कारण सध्या आपण मराठी बोलत आहोत पण व्यवहारी जगात इंग्रजी, हिंदी आणि इतर परदेशी भाषांचा वापर जास्त करत आहोत.
वरील मुद्द्यांचा विचार करता असे ध्यानात येते की मराठी भाषेचा पुरस्कार जर साहित्य, शिक्षण, कला-क्रीडा क्षेत्र अशा सर्व स्तरांवर केला गेला नाही तर मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण होईल आणि एक आधुनिक मराठी भाषा विकसित होईल ज्यात अन्य भाषेतील शब्द आणि वाक्यांचा वापर केला जाईल.
सद्यस्थितीत बोली भाषा मराठी आहे परंतु वास्तविक ज्ञान हे मात्र इंग्रजीतून दिले जात आहे. शिक्षणासाठी विविध शैक्षणिक बोर्ड स्थापन केले जात आहेत ज्यात इंग्रजी ही मूळ तर इतर भाषा या भाषिक विषय म्हणून शिकवले जात आहेत.
अशा शाळांतून घडणारे आजचे विद्यार्थी हे देशाचे आणि महाराष्ट्राचे नागरिक असणार आहेत. त्यांना या मातृभूमीचे वात्सल्य लाभू शकणार नाही कारण मातृभाषाच आज त्यांच्यापासून हिरावून घेतली जात आहे. मराठी साहित्य आणि कलाप्रेम अशा व्यक्तीत उतरणार नाही.
त्यामुळे मराठी भाषेचे भवितव्य ठरवताना आपल्याला बोली भाषेतील होत जाणारा फरक अनुभवला पाहिजे आणि शिक्षणात होत चाललेले अमुलाग्र बदल थांबवले पाहिजेत तर आणि तरच मराठी भाषा टिकू शकेल. शिक्षणाचा मूळ पाया मातृभाषेतून मजबूत केला गेला तर मराठी भाषा वर्षानुवर्षे पुढील पिढीत संक्रमित होत राहील.
पालकांनी मराठी साहित्य वाचले तर त्याची परिणीती म्हणून त्यांची मुले देखील मराठी साहित्यात रुची दाखवणार आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त शिक्षित लोकांनी मराठी साहित्य निर्मितीकडे भर देणे आवश्यक आहे ज्यामुळे तरुणाई आणि किशोरवयीन मुले मराठीतून व्यवहार आणि जीवन ज्ञान मिळवू शकतील.
मराठी भाषिक म्हणून आपल्याला भाषेचे ज्ञान पुढील पिढीत पोहचवणे गरजेचे आहे तसेच शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान यासाठी मराठी भाषेचा वापर याच गोष्टी मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणार आहेत. त्याची सुरुवात म्हणून सध्यातरी सर्व मराठी मुलांना भाषा उत्तमरित्या लिहता वाचता आलीच पाहिजे त्याबद्दल सर्वांनीच आग्रही असले पाहिजे.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला मराठी भाषेचे भवितव्य हा मराठी निबंध (Marathi Bhasheche Bhavitavya Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Nice information of Marathi language Thank you