बालपण परत आले तर – मराठी निबंध | Balpan Parat Ale Tar Nibandh |

प्रस्तुत लेख हा बालपण परत आले तर (Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. मनुष्याला आपल्या आनंददायी आणि निरागस बालपणाची आठवण नेहमी येत असते.

प्रत्येक जण मनोमन बालपण परत मिळण्याची इच्छा कधी ना कधी करत असतो. असे हे बालपण जर परत आले तर काय होईल? या आशयाचा कल्पना विस्तार विद्यार्थ्यांनी या निबंधात करायचा असतो.

बालपण परत आले तर…

आज सुट्टी असल्याने मी खूप दिवसांतून निवांत अंगणात बसलो होतो. तरीही दिवसभर काय काय करायचे आहे असे विचार माझ्या मनात येत होते. सर्वत्र लगबग सुरू झाली होती मात्र माझे लक्ष्य वेधले गेले ते म्हणजे अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे! त्यांचे ते स्वतंत्र आणि स्वच्छंदी खेळणे पाहून मला माझ्या गोड बालपणाची आठवण झाली.

बालपणीच्या आठवणींना मी थोडा उजाळा दिल्यावर मला निरागस, निरहंकारी आणि निखळ अशा स्वभावाचे लहान मूल आठवले ज्याला कशाचाच काहीही फरक पडत नसे. अशा गोड आठवणींनी मी मनातल्या मनात एवढा प्रसन्न झालो की बालपण परत आले तर काय होईल? या प्रश्नाने तर माझे मन पुरते व्यापून गेले.

जसजसे वय वाढत जाते तसतसे आपण कल्पनेच्या दुनियेत प्रवेश करतो आणि मृगजळासारखे आनंदाला वेड्यासारखे शोधत बसतो. बालपण परत आले तर आपण असा शोध घेणारच नाही. आपल्याला भविष्याची आणि भूतकाळाची चिंताच असणार नाही आणि या क्षणात जो काही आनंद असेल तो घेण्याचा आपण प्रयत्न करू.

बालपण संपल्यानंतर हळूहळू आपली जबाबदारी वाढते आणि मग न थांबणारी धावपळ सुरू होते. प्रत्येक दिवशी जगण्यातील नवीन आव्हानांचा सामना करत आपण आपल्या जीवनाची दिशा शोधत असतो. बालपण परत आले तर आपण कोणत्याच दिशेचा प्रवास करणार नाही म्हणजेच तसा काही उद्देश्य आपल्या मनात असणार नाही.

बालपण परत आले तर मनसोक्त खेळता येईल, कोणाचेच बंधन नसेल, स्वच्छंदी उड्या मारता येतील. तसेच दुकानातील चॉकलेट्स व इतर गोड खाऊ रोज खायला मिळेल. पत्त्यांचे बंगले, मातीचा किल्ला, खेळण्यातील गाड्या, छोट्या छोट्या चोऱ्या आणि खोड्या अशा सर्व बाबींची मज्जा पुन्हा एकदा लुटता येईल.

माझे बालपण परत आले तर मला आत्ताच्या सगळ्या घडामोडी पुन्हा नव्याने जगता येतील. मनात घर करून राहिलेल्या अपूर्ण इच्छा पुन्हा पुर्ण करता येतील. थोरामोठ्यांकडून लाड पुरवून घेता येतील. गप्पा – गोष्टी यांची पुन्हा एकदा मैफील भरवता येईल. छोट्या गोष्टींसाठी मोठा हट्ट धरता येईल.

सध्या मला जास्त फिरायला मिळत नाही. परंतु मला बालपण मिळालेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायला मिळेल. गाभाळलेल्या चिंचा, कच्च्या कैऱ्या यांचा आस्वाद पुन्हा लुटता येईल. रानातील रानमेवा पुन्हा चाखायला मिळेल. मित्रमैत्रिणींसोबत उनाडक्या करत फिरायला मिळेल.

मोठे झाल्यावर आपल्याला असे वाटते की काहीतरी मोठे केल्यावर आनंद मिळतो. त्यामुळे छोट्या गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही. परंतु बालपणी लहान लहान गोष्टींमधून मिळणारा आनंद हा असिम असतो. तसाच आणि तोच आनंद मला बालपण परत मिळाले तर सध्याही घेता येईल. त्यामध्ये मला एका क्षणाचीही विश्रांती नसेल.

बालपणी केलेली मज्जा ही आपण निर्व्याज आणि निरपेक्ष जगलेले क्षण असतात. जीवनाचा विकास हा वाढ असल्याने आपल्याला नवनवीन आव्हाने स्वीकारून स्वतःची प्रगती करवून घ्यावी लागेल. त्यामुळे वास्तविक बालपण परत येण्याऐवजी बालपणीची मनःस्थिती परत यायला हवी मग जीवनातील आनंदाला उधाणच राहणार नाही.

तुम्हाला बालपण परत आले तर हा मराठी निबंध (Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment