प्रस्तुत लेख हा बागेचे महत्त्व (Bageche Mahattva Marathi Nibandh) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आपल्या गच्चीत, अंगणात, गावात, शहरात बाग असणे किती महत्त्वपूर्ण असते आणि त्याचे नकळत होणारे लाभ या मुद्द्यांची चर्चा खालील निबंधात केलेली आहे.
बागेचे महत्त्व निबंध | Importance of Garden Essay In Marathi |
बागेत प्रवेश घेताक्षणी आपले अस्तित्व एकदम उत्फुल्लतेने भरून जाते. परिसरात एखादी बाग असल्यास त्या ठिकाणी विहंगम दृश्य निर्माण होत असते. माझ्या मते, प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात आणि प्रत्येक कॉलनीत एक बाग असणे गरजेचेच आहे ज्याद्वारे त्या ठिकाणाची शोभा वाढेल आणि वातावरण शुद्ध राहील.
मनमोहक, सुंदर आणि नयनरम्य अशा बागेचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे. सदाहरित वृक्ष, फुलझाडे, विविध प्रकारची झुडुपे, बसण्यासाठी बाकडे, एखादे छोटेसे मंदिर आणि छोटा जलाशय इ. बाबी आपल्याला कोणत्याही बागेत पाहायला मिळतात. काही बागा एवढ्या सुशोभित आणि सुंदर असतात की त्यामध्ये जाण्यासाठी तिकीट काढावे लागते.
बाग असण्याचे अनेक फायदे आहेत. बागेच्या आसपासचा परिसर एकदम शुद्ध आणि प्रदूषणमुक्त असतो. त्यामुळे बागेच्या परिसरात नियमितपणे एक प्रकारची शीतलता जाणवते. बागेत गेल्यावर थोड्या प्रमाणात का होईना पण आपण निसर्गाच्या सानिध्यात जात असतो. त्यामुळे आपले शरीर व मन एकदम उल्हासित होऊन जाते.
बागेत आपण सातत्याने जायला लागलो की आपल्याला ती सवय देखील लागू शकते. बागेचे महत्त्व जाणून घेऊन आपण आपल्या परिसरात बाग निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. बागेत लहान मुले, तरुण पिढी, वृद्ध लोक अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती विरंगुळा म्हणून येत असतात.
मी लहान असताना बागेत नियमित जायचो. तेथे सुट्टीच्या दिवशी जाऊन पाळण्यात आणि झोपाळ्यात बसायचो. तसेच बॅडमिंटन, लपंडाव, पकडापकडी असे खेळ खेळायचो. त्यामुळे लहानपणीच माझ्या मनात बागेविषयी प्रगाढ कुतूहल निर्माण झालेले आहे ते अजूनही टिकून आहे. मी सध्या अभ्यास किंवा पुस्तक वाचनासाठी बागेत जात असतो.
प्रत्येक पिढीला आकर्षित करतील अशा बाबी बागेत असतात. मनमोहक फुले, पक्षी आणि फुलपाखरे पाहून तर प्रत्येकाला आनंद होतच असतो. काहीवेळा इतर सजीव प्राणी व आकर्षक दिसणारे कीटक देखील बागेत निवास करत असतात. बाग जर मोठी असेल तर तेथे खूप सारे प्राणी कायमचे वास्तव्य करतात.
बागेत सरोवर अथवा छोटे तळे असल्यास त्या बागेच्या सौंदर्यात मानाचा तुराच रोवला जातो. सध्या बागेत रात्रीचेही सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावले जातात त्यामुळे जेवणानंतर लोक शतपावली करण्यासाठी नेहमीच बागेचा पर्याय निवडतात. काही शहरी भागात तर सकाळी चालण्यासाठी बागेतून मार्ग देखील तयार केलेला असतो.
आपण प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्याला आवडणारा विरंगुळा बागेत निर्माण करू शकतो. भोजनालय, वाचनालय, मैदानी खेळ खेळण्यासाठी जागा, प्राण्यांचे नकली बाहुले, सेल्फी पॉइंट अशा प्रकारची विविधता बागेत आणल्यास बाग हे एक प्रकारे पर्यटन स्थळच बनून जाईल.
मनुष्य आणि इतर सर्व पशुपक्षी या सर्वांना मोहीत करणारी अशी एक सुंदर बाग आपल्या परिसरात असणे अत्यावश्यकच आहे. अशा सदाहरित बागेमध्ये नियमित गेल्यास आपले शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य नक्कीच सुधारेल. बागेचा आपल्या आरोग्यावर विधायक परिणाम होत असल्याने बागेचे महत्त्व येणाऱ्या काळात आणखी वाढणार आहे.
तुम्हाला बागेचे महत्त्व हा मराठी निबंध (Bageche Mahattva Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…