कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कोरोना विषाणूमुळे मानवी जीवनात अनेक छोटे मोठे बदल घडून आलेले आहेत. ते सर्व बदल आणि त्या बदलांचा भविष्यात जीवनावर होणारा परिणाम कोरोनानंतरचे जग (Corona Nantarche Jag – Marathi Nibandh) या मराठी निबंधात स्पष्ट करायचा असतो.
कोरोनानंतरचे जग | Corona Nantarche Jag Essay In Marathi |
कोरोना विषाणू चीनमधील वुहान येथून पसरला आणि जगभरात त्याचा संसर्ग झाला. या विषाणूमुळे कोविड-19 या नवीनच रोगाची आपल्याला माहिती झाली. या रोगावर उपचार आणि प्रतिबंध करणे आता शक्य होऊ लागले आहे. परंतु त्यामध्ये संपूर्णतः यश आलेले नाही.
कोरोनाचा संसर्ग अजूनही नष्ट न झाल्याने लसीकरण करून घेणे, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे या गोष्टी नित्य गरजेच्या झालेल्या आहेत. कोरोना काळात मानवी जीवन संपूर्णपणे ढवळून निघाले. त्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले, तेच बदल आता यापुढेही राहतील की नाही हे येणाऱ्या काळातच समजेल.
कोरोनानंतरचे जग हा विषयच खूप रंजक आहे. सध्या मानवी वर्तणूक आणि सहजता यावर झालेले परिणाम पाहता पूर्वीसारखे व्यावसायिक नियम आणि सामाजिक व्यवस्था टिकू शकेल असे दिसत नाही. शिक्षण, तंत्रज्ञान, खेळ, कला, उद्योग, सण-उत्सव या सर्व गोष्टींत कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे.
तंत्रज्ञानाचा वापर सहज असल्याने माणूस दूर असला तरी त्याला पाहणे आणि संपर्क साधणे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना काळात बाहेर फिरणे अशक्य असले तरी लोक मोबाईल आणि संगणक वापरून एकमेकांच्या संपर्कात येत होते.
कुटुंबातून बाहेर जाणे नसल्याने विविध कलाकुसरी, पाककृती, योगाभ्यास, व्यायाम प्रकार शिकणे आणि जगण्याचे विविध मापदंड ठरवणे शक्य झाले. डिजिटल शिक्षण घेणे ही सहज गोष्ट झाली. शिक्षकांशी ऑनलाईन क्लासमध्ये भेटणे देखील नित्याचेच झाले.
कोरोनानंतर देखील शिक्षण, आणि कोणतेही कोर्सेस ऑनलाईन घेणे शक्य होईल. त्यामध्ये सरकार आणि विविध शैक्षणिक संस्था निवेश करतीलच. कोणतेही प्रमाणपत्र शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरजच भासणार नाही.
उद्योगधंदे तर बऱ्यापैकी घरातून काम अशा पद्धतीचे झाले. यापुढे देखील शक्य होईल तेवढे काम घरातूनच केले जाईल. बैठे ऑफिसचे काम तर घरातून देखील शक्य असल्याने ऑनलाईन उद्योग संस्था सुरू होतील. सर्व पगार आणि आर्थिक व्यवहार ऑनलाईनच केले जातील.
कोरोनानंतर जगात झालेल्या बदलांना सामोरे जाणे आणि स्वतःच्या राहणीमानात बदल करणे गरजेचेच आहे. लग्नसराई, सांस्कृतिक सण – समारंभ हे तर काही लोकांच्या उपस्थितीत होऊ लागले आहेत. लग्नातील खर्च आणि सांस्कृतिक देखावा यापुढे असणार नाही, अशी लक्षणे सध्या दिसत आहेत.
कोविड उपचार केंद्र, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस, ऑनलाईन खरेदी, हे बदल मुख्यत्वे आपणाला यापुढे देखील पाहायला मिळतील. सर्व काही ऑनलाईन विकत घेता येऊ शकेल. ऑनलाईन कामाच्या संधी देखील उपलब्ध होऊ लागतील.
दवाखाने आणि वैद्यकीय क्षेत्र हे बऱ्यापैकी सुधारित आवृत्तीत पुढे येऊ शकतील. कारण कोरोनामुळे सर्व लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल सावधान झालेले आहेत. गर्दीत नियमित मास्क वापरणे हा देखील नियम येऊ शकेल. कोरोना नंतरचे जग हे संपूर्णतः वेगळे जग असेल जेथे जगण्याची पध्दती, काम, शिक्षण आणि कौटुंबिक मापदंड बदललेले असतील.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला कोरोनानंतरचे जग (Corona Nantarche Jag – Marathi Nibandh) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…