संघर्ष करून कित्येक जण यशस्वी होतात तर कित्येक जण त्या संघर्षापासून पळ काढतात. संघर्षमय आयुष्य असावेच असे काही जण मानतात. त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर उन्नत होत जाते. तर जे परिस्थितीशी दोन हात न करता आरामशीर किंवा निवांत आयुष्य सुरुवातीला जगतात त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर अधोगती प्राप्त करते व ते दुःखी बनतात. आज स्वतःच्या जीवनाची खरी प्रगती संघर्षामुळेच झाली असल्याची जाणीव यशस्वी जैस्वालला होत असेल. एक सक्षम, कणखर, जिद्दी आणि मेहनती वृत्तीचा क्रिकेटपटू ” यशस्वी जैस्वाल ” याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
यशस्वीचे मूळ गाव उत्तरप्रदेशमधील, भदोही जिल्ह्यातील सुरियावा हे आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत ७ वर्षाचा असताना त्याचे वडील आणि तो मुंबईला येतात. लहानपणी मुंबईत वरळी परिसरात आपल्या चुलत्याच्या घरी यशस्वी राहत असतो. परंतु तिथे राहायला पुरेशी जागा नसल्याने यशस्वी पुढे कालबादेवी परिसरात असणाऱ्या एका डेअरीत तो राहू लागतो. तिथे तो कामही करायचा आणि राहायचा देखील ! क्रिकेटमधील कौशल्य ओळखून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली खरी, परंतु परिस्थिती काहीच अनुकूल नव्हती. ज्या डेअरीमध्ये तो राहायचा तिथे काम करणेदेखील अपेक्षित होते. दिवसभर क्रिकेट खेळल्यानंतर तो थकून जायचा अशातच डेअरीमध्ये काम करणे त्याला जड जाऊ लागले नंतर त्याला तेथून दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले. दोन वेळचे खाणे नीट नशिबात नसताना आई वडील कोणी सोबत नसताना त्याची ही वाटचाल सुरू होती. अत्यंत कष्टप्रद जीवन तो जगत होता.
दुसरीकडे राहण्याची आणि खाण्याची सोय जर करायची असेल तर कामाला पर्याय नाही परंतु क्रिकेटवर असलेल्या प्रेमाखातर तो थेट पोहचतो आझाद मैदानात ज्या मैदानाला मुंबई क्रिकेटची नर्सरी समजले जाते. तिथे तो मुस्लिम यूनाइटेड क्लबच्या ग्राउंड्समैन सोबत टेंट मध्येच राहू लागला. मात्र तिथे झोपण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय होण्यामागे एक अट होती. तिथे त्याला जेवण बनवताना मदत करावी लागे आणि राहण्यासाठी दिवसभर उत्तम क्रिकेट खेळावे लागे. अशा दोन अटी तो नेहमी पूर्ण करत असे. परिस्थितीला दोष न देता अत्यंत कठीण वेळ त्याने पाहिली परंतु त्यातून देखील मार्ग काढत तो क्रिकेट खेळतच राहिला.
त्याचे वडील काही रक्कम घरून पाठवत असत परंतु त्यामध्ये सर्व खर्च भागवणे अवघड होते. गरज पडल्यास तो क्रिकेट व्यतिरिक्त मैदानातील इतर काम देखील करायचा किंवा क्रिकेट सामन्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःच्या गरजा पूर्ण करत असे. एवढ्या लहान वयात त्याची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वतःनेच घेतली होती. या सर्व संघर्षामुळे त्याच्यात कमालीची प्रगल्भता येत होती. त्याचाच प्रत्यय त्याच्या खेळीतून येत असे. मानसिक कणखरपणा आणि संयम हे दोन गुण त्याला चांगलेच अवगत झालेले होते.
जगण्यासाठी आणि क्रिकेटसाठी आता पैसे लागणार होते. त्याने पाणीपुरीच्या गाड्यावर काम करायला सुरुवात केली. तेथून त्याला चांगलेच पैसे मिळत होते. रामलीला असताना त्याची भरपूर कमाई होत असे. त्याचे क्रिकेट मधील इतर मित्र आणि खेळाडू कधी पाणी पुरीच्या गाड्यावर येऊ नये असे त्याला वारंवार वाटत असे. त्यांनी हे बघितल्यावर काय म्हणतील या कारणास्तव त्याला थोडा कमीपणा वाटत असे. परंतु मित्रांना ही गोष्ट समजते आणि त्याचे सर्व मित्र आनंदाने त्या गाड्यावर पाणीपुरी खाण्यासाठी जात असत. असे सर्व असतानादेखील त्याने क्रिकेट सोडले नाही. यशस्वीचे स्वप्न भारतासाठी क्रिकेट खेळणे हे होते. त्याने त्याच्या सरावात कधीही कमतरता येऊ दिली नाही.
कशी निखरली प्रतिभा –
आझाद मैदानावर सराव करत असताना कोच ज्वाला सिंह यांची नजर यशस्वीवर पडली. उत्तरप्रदेशमधीलच गोरखपूर येथून मुंबई येथे अडीच दशक वर्षांपूर्वी ज्वाला सिंह आलेले असतात. त्यांना या मुलाचा संघर्ष खूपच भावतो. स्वतःप्रमाणेच हा मुलगादेखील क्रिकेटमध्ये भविष्य घडवू पाहत आहे. याचा सार्थ अभिमान बाळगत ज्वाला सिंह त्याला फ्री ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतात. येथून यशस्वीची प्रतिभा उजळण्यास सुरुवात होते. जून २०१८ मध्ये श्रीलंकेविरूध्द त्याला १९ वर्षाखालील भारतीय संघात स्थान मिळते. पहिल्या दोन सामन्यात त्याला अपयश मिळाल्यानंतर नंतरच्या दोन्ही सामन्यात त्याला वगळले जाते. पुन्हा ५ व्या सामन्यात निवड झाल्यानंतर शानदार शतक झळकावत भारतासाठी तो सामना आणि मालिका जिंकून देतो.
यानंतर इंग्लंड आणि आशिया चषक या दोन्ही मालिकेमध्ये दमदार प्रदर्शन करत त्याने स्वतःचे नाव सार्थक ठरवले. यानंतर विजय हजारे ट्रॉफी मध्ये त्याने झारखंड विरूध्द एकदिवसीय सामन्यात मुंबईकडून खेळताना द्विशतक झळकावले आहे. हे द्विशतक झळकवल्यानंतर तो खरा प्रकाशझोतात आला. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याचे प्रदर्शन चांगले झाले आहे. त्याने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरूध्द खेळलेल्या सामन्यात शतक झळकावत सामना एकतर्फी भारताला जिंकून दिला.
संघर्षाला खूप महत्त्व आहे. आहे ती परिस्थिती घेऊन त्यावर रडत बसणे किंवा ती बदलणे असे दोन पर्याय नेहमी खुले असतात. परिस्थिती बदलण्याचा पर्याय सुरुवातीला खूप कष्टप्रद असल्याने आणि सुखाने आराम करण्यात काहीच नुकसान होत नाही असे वरवरचे वाटत असल्याने कोणीच संघर्षासाठी तयार नसते. कोणीच सुरुवातीला दुःख झेलण्यासाठी तयार नसते. परंतु हा संघर्षाचा मार्ग ज्यांनी निवडला त्यांच्या आयुष्याचं चीज झाल्याखेरीज राहत नाही. त्याप्रमाणेच यशस्वीही स्वतःचा मार्ग निवडत आणि संघर्ष करत आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. त्याप्रमाणेच इथून पुढे देखील चांगले प्रदर्शन करत त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळावी अशीच सर्वांची इच्छा!