खरे सौंदर्य म्हणजे काय?

सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. कोणी बाहेरील जगात साैंदर्य शोधतो आणि त्यानुसार आपले जीवन घडवत जातो तर कोणी स्वतःमध्ये साैंदर्य शोधतो आणि बाहेरील जगात त्याची प्रतिमा उमटते.

खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज भासते. त्यावेळी आपल्याला मुख्य दोन बाबी जाणून घ्याव्या लागतील.

• शारिरीक अथवा भौतिक साैंदर्य (बाह्य)

• अंतर्दृष्टी व बाह्य दृष्टिकोन

१. शारिरीक / बाह्य साैंदर्य

शारिरीक साैंदर्य हे सुरुवातीला आकर्षणाचा बिंदू ठरत असते. परंतु कोणतेही व्यक्तिमत्त्व हे मानवी मूल्यांनी सजले नसेल तर असे सौंदर्य इतर व्यक्तींसाठी घातक ठरते.

शारिरीक साैंदर्य हे एका वयोमर्यादेपर्यंतच छान वाटते. परंतु त्याचा लाभ मात्र इतर लोकांना होत असतो. आयुष्यभर आपण शारिरीक सौंदर्याचा पुरस्कार करून जगू शकत नाही.

स्वभावातील गुण म्हणजे आपली समज, आपला विवेक हेच आपल्याला वयासोबत वाढवावे लागतात.

स्वभावातील काही गुण हे सुरुवातीला छान वाटतात जसे की विनोदी बुद्धी, आत्मविश्वास ई. परंतु ते गुण अहंकारात रूपांतरित होत जातात हे आपणांस समजत देखील नाही. अशा व्यक्ती कर्तुत्वाने मोठ्या बनतात परंतु खऱ्या अर्थाने समाजासाठी घातक ठरत असतात.

उदा. एखादा व्यक्ती यशस्वी झालाच तर तो लगेच प्रसिद्ध होतो परंतु त्याचे साैंदर्य हे त्याचे कर्तृत्व होते. समजा आता तो स्वतःच्या अधिकार पदाचा गैरवापर करू लागला तर असा व्यक्ती हळूहळू स्वतःची प्रतिमा कुरूप बनवत जातो.

खरे सौंदर्य हे बाहेरील जगात आपण किती यशस्वी आहे यावर अवलंबून नाही तर ते आपण आतून कसे आहोत? आपण आनंदी आहोत का? आणि आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे की नाही? अशा प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहे.

२. अंतर्दृष्टी आणि बाह्य दृष्टिकोन

खऱ्या सौंदर्याचा विचार केल्यास आपणांस जाणवेल की आपण आनंदी व निरोगी असायला हवे. त्यासाठी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणे व ते वाढवत नेणे हा एक पर्याय सुरुवातीला आपल्या समोर उरतो.

शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याच्या संकल्पना आपल्या समोर स्पष्ट होत गेल्या की आपण आपल्यासमोर त्याहीपेक्षा उदात्त जीवनाचे ध्येय ठेवू शकतो.

उदात्त जीवनाचे ध्येय ठरवताना आपली अंतर्दृष्टी विकसित होत जाणे अत्यावश्यक आहे. आपल्याला आपलेच जीवन समजत जाणे गरजेचे आहे.

जीवनाचे अंतर्बाह्य निरीक्षण आणि परीक्षण अशा बाबी आपल्याला स्वतःच्या आंतरिक विकासात उपयोगी ठरू शकतील. स्वतःचा आंतरिक विकास शक्य होत गेला की आपला सर्वांप्रती असलेला दृष्टिकोन सकारात्मक, स्पष्ट आणि सुंदर होत जातो.

सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला आनंदाची अनुभूती करून देत असतो. त्यासोबतच सर्वत्र सौंदर्याची जाणीव विकसित होत जाते. आपली नजर स्वच्छ होत जाते आणि त्यामध्येच खरे सौंदर्य असल्याचे समजते.

आपण इतरांना कोणत्या नजरेने पाहतो यातच अस्सल सुंदरता सामावलेली असते. अशा नजरेतून आपले व्यक्तिमत्त्व हे संवेदनशील आणि सुंदर बनत जाते. करुणा, कृतज्ञता असे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात झळकत जातात.

आपण दिवसेंदिवस शांत, आनंदी आणि समाधानी होते जाणे यातच जीवनाचे सौंदर्य सामावले असल्याने आपल्या दिवसातील बहुतांश वेळ हा अंतर्दृष्टी विकसित करण्यासाठी दिला गेला पाहिजे.

निष्कर्ष –

सुंदरता ही आंतरिक आणि बाह्य स्वरूपाची असते. बाह्य सौंदर्याचा लाभ हा इतरांना होत असतो. इतर लोक अशा बाह्य सौंदर्याचा लाभ स्वतःच्या स्वार्थासाठी घेऊ शकतात.

परंतु स्वतःचा स्वभाव, स्वतःचे जीवन समजून घेणे आणि आंतरिक विकास साधत जाणे यातून मानवी मूल्ये विकसित होत जातात आणि आपली दृष्टी सुंदर बनत जाते. वास्तविक पाहता अशा सौंदर्याचा लाभ सर्वस्वी स्वतःला आणि इतरांनाही होत असतो.

Leave a Comment