वसुबारस – संपूर्ण माहिती | Vasu baras Information In Marathi |

आपल्याला मराठी संस्कृतीबद्दल आणि साजरे करत असलेल्या सणांबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या जगण्यात स्वतःच्या कामाचा, वस्तूंचा आणि सजीवांचा समावेश होत असतो, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो. त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस! महाराष्ट्रात “वसुबारस” (Vasubaras) या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होते.

वसुबारस म्हणजे काय? What Is Vasubaras |

भारतात दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे तसेच गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसु – बारस!

वसु बारस हा दिवस, कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो. या द्वादशीस गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन! आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे “सर्वांमध्ये वास करणारा” असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस!

वसुबारस कशी साजरी केली जाते?

गाई हा हिंदू संस्कृतीत पवित्र प्राणी आहे. त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे. वसु बारस या दिवशी गाईची तिच्या पाडसासह आणि आता तर त्यासोबत इतर प्राण्यांचीही सायंकाळी पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला आणि वासराला खाऊ घालतात. त्याअगोदर गाईच्या व वासराच्या पायावर पाणी घालून व त्याबरोबर हळदी – कुंकू वाहून त्यांची आरती ओवाळली जाते.

वसु बारस या दिवशी ज्यांच्या घरी गाई – वासरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दूध तसेच दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसु बारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरण पोळीचे जेवण बनवले जाते. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील पकडतात.

वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे दिवस दिवाळी या सणात साजरे केले जातात. संपूर्ण रोषणाईने आसमंत उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसु बारस या दिवसाने होणारी सुरुवात म्हणजे सर्वत्र आल्हाददायक वातावरण असते तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची, कुलदेवता, ग्रामदेवता या सर्वांची उपासना करतात.

वाचकांसाठी थोडेसे :

वसुबारस या दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हाला या दिवशी कुठला मंगल अनुभव आला असेल किंवा तुमची वसु बारस (Vasu Baras) साजरी करण्याची वेगळी प्रथा असेल तर नक्की आम्हाला कळवा…धन्यवाद!

Leave a Comment