वाचनाचे महत्व सर्व स्तरातील व्यक्ती जाणतात. लहान मुलांना वाचनाचे महत्व पटवून सांगितले जाते. शालेय जीवनात असताना वाचनाचे संस्कार होणे अत्यावश्यक असते. त्यासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व हा विषय निबंधासाठी दिला जातो. निबंध लिहताना मुद्देसूद आणि उदाहरण देऊन लिहावा.
‘ वाचाल तर वाचाल ‘ किंवा ‘ वाचनाचे महत्त्व ‘ | Vachanache Mahattv |
कुठलाही महान व्यक्ती वाचनामुळे महान बनू शकला. हे त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतर समजते. लहान असल्यापासून आपल्याकडून अक्षर ओळख, वाचन आणि पाठांतर करवून घेतले जाते. एकदा का वाचनाची आवड निर्माण झाली की आपोआपच पूर्ण आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री होते.
वाचनाचा संदर्भ आपल्याला वयानुसार दिला गेला आहे. लहान असताना फक्त अक्षरे, थोडे मोठे झाल्यावर कविता, छान छान गोष्टी तसेच शाळेत जाऊ लागल्यावर पाठ्यपुस्तक आपल्या वाचनात आलेले असते. अशा पाठ्यपुस्तकातून आपल्याला विविध लेखकांची ओळख होते. समाजातील आणि मानवी जीवनातील सर्व पैलू पुस्तकांत मांडलेले असतात.
शाळेत असताना ग्रंथालय असणे आवश्यक आहे. शाळेतील पुस्तकांव्यतिरिक्त आपल्याला संपूर्ण जगाचे ज्ञान ग्रंथालयात बसून होत असते. पुस्तक हेच आपले खरे मित्र असतात. पुस्तकांशिवाय शाब्दिक आणि बौद्धिक ज्ञान होणे अशक्य आहे.
पूर्ण जगभरात असंख्य तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ, कवी, लेखक, शिक्षक यांची पुस्तके आहेत. प्रत्येक व्यक्तीची जी आवड आहे त्या क्षेत्रातील पुस्तके, ग्रंथ वाचन करणे त्याला फायदेशीर ठरू शकते. एखादा खेळाडू लहान असताना खेळाबरोबर त्या खेळासंबंधित पुस्तके वाचत राहिला तर त्याची खेळाबद्दल समज किती वाढेल, याचा अंदाज आपण लावू शकतो.
भारतातील शिक्षण क्षेत्र, सरकारी क्षेत्र, उद्योगी क्षेत्र अशी सर्वच क्षेत्रे हुशार व्यक्तींसाठी आहेत. त्यातील गूढ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वाचनाची गोडी आवश्यक आहे. चांगले भविष्य घडवण्यासाठी आणि उज्ज्वल कीर्ती मिळवण्यासाठी वाचन आवश्यक आहे.
भारतातील सर्व समाजसुधारक, नेते, लेखक वाचनाचे महत्व पटवून देतात. तुम्हाला जी भाषा अवगत असेल त्याद्वारे तुम्ही वाचायला सुरुवात करा. सुरुवातीला कंटाळा वाटेल परंतु सवय झाल्यानंतर तोच कंटाळा दूर होतो आणि फक्त पुस्तक पकडले जाते.
आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे आपल्याला वाचनातून कळते. आयुष्यातील वेगवेगळ्या दिशांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य वाचनातून प्राप्त होते. बुद्धीची आणि तर्कदृष्टीची धार वाढवण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीला पर्यायाने कुटुंबाला, समाजाला एक नवीन विकासाची दृष्टी प्राप्त होते.
आज मोबाईल, तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याद्वारे ग्रंथालय तुमच्या हातातच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगभरातील लेखक तुमच्या भेटीला येत असतात. त्यांचा उपयोग करून घ्या. तुमच्या सुप्त गुणांचा विकास होऊ द्या. एकदा का शब्द तुमच्या साथीला आले की मानवी गुण आणि व्यक्तिमत्त्व प्रकाशित होत असते.
दररोज वर्तमानपत्र जरी वाचायला सुरुवात केली तरी पूर्ण जगाची सफर तुम्ही एका दिवसात करून येऊ शकता. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चालले आहे हे तुम्हाला समजते. मानवी मूल्ये, अध्यात्मिक गुण, काव्यरचना, लेखन कौशल्ये, वक्तृत्व कौशल्य असे नानाविध गुण तुम्ही वाचनातून विकसित करू शकता.