जास्त टीव्ही बघत असाल तर तयार व्हा या परिणामांना सामोरे जायला…

टीव्ही का बघावा? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर तो म्हणेल “गप बस..जा घरी..”परंतु नकळत होणारे टीव्हीचे दुष्परिणाम जर थोडेसे अभ्यासले तर कळेल की वर्षानुवर्षे एकच गोष्ट करीत राहिल्याने काही व्यक्ती त्यांच्या जीवनात फिल्मी वाक्ये बोलू लागतात किंवा सिरीयलमध्ये जसे घडत असेल तसेच वागत राहतात, मग ती स्त्रीच्या नटण्याची लकब असो किंवा पुरुषाचा फक्त एका स्त्रीसाठी हजारो लोकांचा केलेला घात असो.

सर्व काही नाटकीयदृष्ट्या एवढे सजवलेले असते की बोलायची सोय नाही. असेच काही परिणाम जे बालपणापासून ते तरुण होईपर्यंत होत राहतात ते या लेखात मांडण्यात आले आहेत आणि उपरोक्त आयुष्य कसे नाटकीय होत जाते याबद्दल देखील चर्चा केली आहे.

१. हिंसाचार        

आपण टीव्हीवर काय बघतो यावर आपला स्वभाव किंवा आपल्या सुप्त इच्छा काय आहेत हे समजू शकतं. आपला कल हिंसाचार बघण्यात असेल तर वेळीच सावधान व्हा, कारण आपल्या इच्छेनुसार जर आपण काहीही बघत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्यावर पर्यायाने आपल्या मुलांवर होऊ शकतो. सारखं एकच बघत राहिल्याने तस करण्याची जाणीव निर्माण होऊ लागते.

मग हिंसाचार झाला की त्याचे परिणामही स्वतःलाच भोगावे लागतात. एक अभिनेता त्याच्या वडीलाच्या झालेल्या अपमानाने पेटून उठून पूर्ण कत्तलखानाच उघडतो आणि ज्या गुंडाने अस केलं त्यापेक्षाही मोठा गुंड होऊन दाखवतो. तरुणाई तर सरळ सरळ भाईगिरीचीच भाषा बोलत असते. मुन्ना भाई ,जग्गु दादा हे त्यांचे आदर्श झालेले दिसतायेत.

२. व्यसन

आज जर आपण पाहिले तर सर्रास टीव्हीवर व्यसन केलेलं दाखवतात. मोठमोठे स्टार्स ज्यांना आपण देव मानतो (भारतात तरी) अशा लोकांनी सिगारेट ओढली आणि थोडी स्टायल मारली की तरुणाई लगेच आकर्षित! मग त्यांचा प्रेमभंग झाला की लगेच दारू! हे सर्व स्टार्स पुढील पिढीला एक संदेशच पोचवत असतात. मज्जा करा, काहीही करा, अशा संदेशाद्वारे पुर्ण पिढी नाकरती बनू शकते याची जाणीव त्यांना होत नसते.   

एकदा कोणत्याही गोष्टीची सवय लागली की शरीर त्यासाठी वारंवार मागणी करू लागते. मग ते कोणत्याही प्रकारचं व्यसन असो. वयाच्या सोळाव्या वर्षी मज्जा म्हणून केलेलं व्यसन आज त्याला शांतपणे झोपू देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती का निर्माण झाली असावी. टीव्हीत दाखवण्यात येणारे स्टार्स व्यसन केल्यानंतर मज्जा करतात त्यांना तरुणाई कायम मिळालेली आहे, असे खोटे खोटे पण खरे करून दाखवलेले असते. परंतु सामान्य माणूस? खरा अनुभव जर कसोटी म्हणून वापरला तर लक्षात येईल की त्याच्या आयुष्याची कशी वाट लागत गेली आहे.

३. उच्च कोटीचा राग   

टीव्हीत जर बघितलं तर कोणी कोणाला नुसतं बोललं तरी त्याचा निर्घृण खून केला जातो अशा प्रकारचं भयानक दृश्य जर लहान मूल बघत असेल तर तो त्याची वागणूक म्हणून रागाचाच स्वीकार करेल. थोड्या थोड्या गोष्टींवर अति प्रतिसाद देणं आणि तेही रागाच्या भरात! याचा परिणाम खूप दुरगामी होऊ शकतो. आज नात्यात होत जाणारे बदल किंवा वारंवार होणारे घटस्फोट हे याचेच परिणाम आहेत हे कोणाला सांगूनही पटणार नाही.

टिव्हीत दाखवल्याप्रमाणे आपण आपली एक खोटी प्रतिमा प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे रचत जातो त्या प्रतिमेला जर कोणी धक्का लावला की झालेच वाद म्हणून समजा! या वादाची कलाटणी म्हणजे घे घटस्फोट! स्वैर आणि मुक्त स्वभाव हा टीव्हीत दाखवल्याप्रमाणे कधीही नसतो.

४. लोभ आणि शर्यत   

‘माझे स्वप्न आणि त्यासाठी होणारी शर्यत असे जीवन म्हणजेच काहीतरी वेगळं जगणं’ हे टीव्हीमार्फतच आपल्याला कळतं. त्याचा योग्य अर्थ न लावता आपण अवास्तव अशी स्वप्न घेऊन बसतो. मग लहान मुलांचे काय होत असेल? ते विनाकारण प्रौढ व्यक्तींसारखे वागत राहतात. त्यांच्या जगण्यातला निरागसपणा जाऊन एक वेगळीच गैरसमजूत आपल्याला नेहमी जाणवते. एक मोठी कार, मोठे घर असणे म्हणजे प्रतिष्ठा त्यासाठी आयुष्य गेले तरी चालेल अशी भावनाच जीवनाला उदात्त बनू देत नाही.

मग मोठा माणूस म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त! मग अशातून राजकारण किंवा पिळवणुकीची सर्व माध्यमे करिअर म्हणून निवडली जातात. आयुष्य गेले तर गेले, वाट लागली तर लागली. आज एक मोठा नेता व्यवस्थित मरत नाही. बालमनावर झालेले हे असे लोभेचे व लालासेचे संस्कार, जीवनाबद्दल पाठ आणि एक न संपणारी जीवघेणी शर्यत त्यांना एका खोल गर्तेत घेऊन जाते.

५. नकारात्मकता

प्रेम फक्त हिरो आणि हिरोईन यांच्यातच असते बाकीचे सर्व आपापल्या घरी. मग फक्त एका जाणिवेतून येणारी नकारात्मकता खूपच छान दिग्दर्शित केली जाते आणि त्याला अवॉर्डसुद्धा दिला जातो. पण हीच नकारात्मकता ते समाजमनात किती खोलवर रुजवत आहेत याची जाणीव त्यांना नसावी. असेच घडते रोजच्या मालिकेतूनसुद्धा! वर्षानुवर्षे घरातून बाहेर न पडलेल्या व्यक्तींचे घराघरात कसे वाकयुद्ध होत असते हे बघणे म्हणजे एक पर्वणीच असते.

ती पर्वणी फक्त नकारात्मकता दाखवल्यामुळेच येते हे लोकांना कळत नाही. आणि रोजच्या जीवनातसुद्धा त्या मालिकेतल्या भावना कशा शिरकाव करून जातात हे त्या त्या व्यक्तीच्या वागण्यातूनच कळते. अलिकडे तर सर्रास वासनामय आणि व्यसनयुक्त अशा वेबसिरीज येतायेत. त्यांना त्यांचा मजबूत असा मोबदला मिळतो पण आपल्याला काय मिळते? त्यांची शरीरलालसा! त्यांचे व्यसन करण्याचे प्रकार! की आपल्या ज्ञानात थोडीशी भर म्हणून दारूच्या बाटल्यांची नावे!                 

या सर्वात आपला वेळ वाया जातोय पर्यायाने आयुष्यही! हे कळण्यासाठी थोडे दिवस या परिणामांव्यतिरिक्त काहीतरी चांगले आयुष्यात जोपासा जे अंतरप्रेरणेतून आलेले असेल.

हे हि वाचा- हि ५ राज्ये आहेत भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्ये.

Leave a Comment