सूर्य मावळला नाही तर – मराठी निबंध | Surya Mavalala Nahi Tar Nibandh

प्रस्तुत लेख हा सूर्य मावळला नाही तर (Surya Mavalala Nahi Tar Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे.

सूर्य हा पृथ्वीवर जीवनदायी ऊर्जा प्रदान करतो परंतु तो प्रत्येक दिवशी मावळतो सुध्दा! असा हा सूर्य मावळलाच नाही तर काय होईल? या प्रश्नाचा कल्पना विस्तार विद्यार्थ्यांना या निबंधात करावयाचा असतो.

सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya Mavalala Nahi Tar Marathi Nibandh

आमचा क्रिकेटचा सामना अत्यंत रंजक वळणावर आलेला असताना सूर्यास्त झाला आणि सर्व खेळाडू निराश झाले. जर सूर्य थोडा उशिरा मावळला असता तर तो सामना पूर्ण होऊ शकला असता. मला खेळायला खूप आवडत असल्याने मला असे वाटते की सूर्य मावळूच नये पण जर सूर्य मावळलाच नाही तर नक्की काय होईल?

सूर्य हा संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अखंड जीवनदायी ऊर्जा स्त्रोत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे सर्व सजीवसृष्टी जीवन जगत आहे आणि नियमितपणे विकसित होत आहे. वास्तविक भौगोलिक स्थिती व कारणे वेगळी असली तरी आपल्यासाठी मात्र सूर्य दररोज उगवत आणि मावळत असतो.

सूर्य मावळला नाही तर आपली सर्व कामे पूर्ण होतील. उद्योग, शेती, शाळा आणि घरकाम अशी कामे आपल्याला हवी तेव्हा करता येतील. “रात्र झाली आता झोपी जा!” असे कोणीही म्हणणार नाही. सूर्य सतत असेल तर रात्र ही संकल्पनाच नसेल आणि अंधार, चंद्र, तारे अशा बाबी आपल्याला अनुभवात येणारच नाहीत.

मनुष्य सातत्याने जागृत राहू शकेल. त्याची जीवन ऊर्जा वाढलेली असेल. रात्र नसल्याने वीज बचत होईल. वीज निर्मितीचा खर्च कमी होईल. तसेच अंधारात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी कमी होतील जसे की चोरी होणार नाही, दरोडा पडणार नाही आणि रात्रीचे होणारे अपघात टळतील.

सूर्यापासून प्रचंड ऊर्जा मिळत असल्याने सूर्यप्रकाशावर चालणारी उपकरणे बनवता येतील. मानवी जीवन आणखी सुखकर आणि उत्साही बनत जाईल. सूर्य मावळलाच नाही तर सजीव सृष्टीला त्याचे तोटेही सहन करावे लागतील. सर्वात मोठे नुकसान होईल ते निसर्गाचे आणि पर्यायाने मानवाचे देखील!

मानव आणि इतर सजीव हे निसर्ग आणि पर्यावरणामुळे जीवन जगत आहेत. सूर्य संपूर्ण वेळ असेल तर निसर्गचक्र व्यवस्थित घडणार नाही. वातावरणात आवश्यक असणारी शीतलता नाहीशी होईल. सर्व ऋतूंचे चक्र आणि व्यवस्था संपुष्टात येईल. अशा सर्व बाबींचा परिणाम म्हणून सजीवसृष्टीला धोका निर्माण होईल.

सूर्य मावळला नाही तर आपले आरोग्य अबाधित राहू शकेल असे वाटत नाही. रात्रीच्या वातावरणात आपल्या शरीराला आराम मिळत असतो. अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी या रात्रीच्या झोपेमुळे बऱ्या होत असतात. रात्रीची शीतलता आणि अंधार सर्व सजीव सृष्टीला अत्यंत आवश्यक असतो.

सूर्य मावळला नाही तर मानव तसेच इतर सजीवांना फायदेही होतील आणि तोटेही! त्यांचा सारासार विचार करून असे वाटते की जे निसर्गचक्र चालू आहे त्यामध्ये दिवस आणि रात्र दोन्हींची आवश्यकता आहे. म्हणजेच मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम पाहून “सूर्य मावळला नाही तर…” या विचारावर मी लगेच लगाम लावला.

तुम्हाला सूर्य मावळला नाही तर हा मराठी निबंध (Surya Mavalala Nahi Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment