Subhashchandra bose speech in Marathi
सुभाषचंद्र बोस –
स्वातंत्र्यलढ्यात असे काही मोजकेच नेते होते ज्यांनी आपले कर्तृत्व इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले. सुभाषचंद्र बोस हे देखील त्यापैकीच एक होते. त्यांना
नेताजी या नावाने ओळखले जात होते. पूर्ण आयुष्यात स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्यात असलेली तळमळ आपल्याला जाणवते. जेवढे कर्तुत्व तेवढेच दातृत्व ही असलेला हा नेता स्वातंत्र्यपूर्व काळ गाजवून गेला. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली. “जय हिंद” ,”तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” या दोन्ही नाऱ्यांचे जनक सुभाषबाबू आहेत. अशा या महान नेत्याचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटक (ओडिसा) या ठिकाणी झाला.
“आझाद हिंद सेना” ही पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. प्रत्येक भारतीय तेव्हा स्वातंत्र्याची आस धरून होता. सुभाषचंद्र बोस यांनी याच महत्त्वाकांक्षेचा उपयोग करून अनेक चळवळी उभ्या केल्या. “चलो दिल्ली ” अशी गर्जना करत असलेली सेना आणि देशासाठी प्राण देऊ इच्छिणाऱ्या भारतीय स्त्रीयांची “झाशी राणी पलटण” असे दोन मोठे सैनिकी बळ सुभाषबाबूंनी एकवटले होते. अनेक चळवळी व उठावात स्वतःला झोकुन देणाऱ्या या दोन्ही सेना इतिहासात अजरामर झाल्या. देदीप्यमान कर्तुत्व आणि अंगाऱ्यासारखे शब्द यांनी अखिल भारताला नवीन ऊर्जा देऊ केली होती. इंग्रजांशी लढताना आपल्याला एक सैनिकी बळ देखील आवश्यक आहे याची जाणीव सुभाषबाबूंना होती. सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते.
महात्मा गांधीजींनी एकदा अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना नेताजींचा “देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव भारतीयांवर खूप होता, काही जाणकार आणि इतिहासकार असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर त्यांनी अखंड भारत शाबूत ठेवला असला. भारताची फाळणी झालीच नसती.
सुभाषबाबूंच्या जीवनात अनेक चढउतार पाहायला मिळतात. त्यांचे जीवन एवढे अस्थिर असताना स्वातंत्र्याची धग तेवढी मनात कायम होती. १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा येथील काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. यानंतर नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली. असे बंड सरकारविरुद्ध असल्याचे भासवून त्यांना १९४० मध्येच नजरकैदेत ठेवण्यात आले. जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन करण्यात ते यशस्वी झाले व पेशावर – मास्कोमार्गे ते जर्मनीला गेले. कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
भारताबाहेर नेताजी आझाद हिंद सेना स्थापन करण्याच्या उद्देशाने झपाटलेले होते. भारतात परतायचे असल्यास पूर्ण ताकतीनिशी उतरायचे आणि परकियांचा दारुण पराभव करायचा असे एकमेव उद्दिष्ट असणारे नेताजी पूर्ण तयारीत होते. आपल्या सेनेने आक्रमण केल्यावर भारतीयांचा, सामान्य जनांचा देखील पाठिंबा तेवढाच आवश्यक आहे हे नेताजी ओळखून होते. आक्रमण झाल्यानंतर भारतीय नागरिकांचा उठाव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे याचे नियोजन व पूर्ण आकलन सुभाषचंद्र बोस यांना होते. यासाठी देशवासियांना आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. हे खूपच कठीण काम होते.
इंग्रजांनी आझाद हिंद सेना बाबत खूपच अपप्रचार केला होता. आझाद हिंद सेना ही जपानच्या मदतीने भारतावर आक्रमण करण्यास सज्ज आहे आणि त्यांना सत्तेची लालसा आहे असा प्रचार इंग्रजांनी भारतात चालवला होता. भारतीय लोक विश्वास कसा ठेवतील याचीच काळजी बोस यांना होती. भारतात तर आझाद हिंद सेना ही घरभेदी सेना आहे असेच सांगण्यात आले होते. एक नकारात्मक भावना पसरवण्यात मिश्किल सरकार व्यस्त होते.
आपले जागतिक स्थान काय असेल आणि अशी परिस्थिती राहिल्यास आझाद सेना आपला उद्देश्य गमावून बसेल व बाकीची राष्ट्रे सहकार्य करणार नाहीत हे सुभाषबाबू जाणून होते. आपली सेना ही भारताचे सैनिकी नेतृत्व करत आहे हे सर्व आशियाई देशांना कळले पाहिजे असे सुभाबाबुंना मनोमन वाटत होते. आझाद हिंद सेना स्थापनेमागे स्वंतत्र भारताचे स्वप्न होते. एक काल्पनिक पण सेनेतच कार्यरत असलेली कार्यप्रणाली होती. या सर्वांचा विश्वास रास्त ठरत गेला पाहिजे. मित्र राष्ट्र म्हणुन आम्हाला जे पाठिंबा देत आहेत त्यांचा सारासार विश्वास हा वाढत गेला पाहिजे, मिळणारे स्वातंत्र्य हे आझाद हिंद सेनेचे असेल आणि त्यासाठी कुठलेही मित्रराष्ट्र कसलीही कुरघोडी करणार नाही याबद्दल सुभाषबाबू आग्रही होते.
• आझाद हिंद सेनेची थोडक्यात माहिती –
नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले. तसेच सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे नेतृत्व नेताजीकडे देण्यात आले. आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ४ ब्रिगेड होत्या. आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व “माऊडॉक” येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. नेताजी इंग्रजांवर दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले होते.
• नेताजींचा मृत्यू –
असा हा हरहुन्नरी नेता १८ ऑगस्ट १९४५ रोजी बेपत्ता झाला, नंतर त्यांचा कुठेच पत्ता न भेटल्याने अनेक तर्क वितर्क करण्यात आले. त्यांचा मृत्यू हे भारताच्या इतिहासातील एक अनुत्तरित रहस्य आहे. त्यांच्या मृत्युचे ठोस पुरावे कुठेच नसल्याने काही जण तैवान येथे झालेल्या विमान अपघातात सुभाषचंद्र बोस मरण पावले असे सांगतात.