महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास कार्यालय विविध उपक्रम राबवत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरीब शेतकरी मुलीच्या लग्नामुळे अतिरिक्त कर्जात बुडू नये असा उद्देश या योजने मागचा आहे. या योजने संदर्भात अधिक माहिती या लेखात दिलेली आहे.
योजनेत देण्यात येणारी रक्कम –
१ – शुभ मंगल सामूहिक विवाह या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा शेतमजूर याचे वार्षिक उत्पन्न १ लाखापर्यंत असावे.
२ – अनुदान : मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेले मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी जोडप्यासाठी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान आईच्या नावाने आणि आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने देण्यात येते. आई – वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते.
तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये देण्यात येतात. विवाह आयोजन आणि समारंभाचा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम देण्यात येते.
अटी व नियम :
१ – वधू ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक असावी. त्याबाबत ग्रामसेवक / तलाठी यांचा दाखला असावा.
२ – विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे यापेक्षा कमी असू नये. याबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माच्या स्थानिक प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
३ – वधू – वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता देण्यात येणार नाही. तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देण्यात येईल.
४ – तलाठी किंवा तहसिलदार यांनी दिलेला १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
५ – नवीन सुधारित योजने अंतर्गत जे जोडपे विवाह सोहळ्यात सामील न होता विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह करतील त्यांनाही १० हजार रुपये अनुदान प्राप्त होईल. सामूहिक विवाह संस्था या कार्यासाठी विशिष्ट दिवस ठरवतात तसा वेळ एखाद्याकडे नसल्यास सरळ विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करू शकतात. अतिरिक्त खर्च आणि वेळ वाचतो.
६ – या योजनेतील लाभार्थ्यांना बँकेची सर्व माहिती जसे बँक शाखा, खाता क्रमांक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्जात नमूद करून द्यावी लागेल. सामूहिक विवाह सोहळा ज्या दिवशी असेल त्याच्या एक महिना अगोदर सर्व कागदपत्रे, अर्ज कार्यालयात सादर करावे लागतील.
७ – विवाह नोंदणी प्रमाणपत्र व विवाहित जोडप्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वयंसेवी संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच प्रति जोडप्यामागे दोन हजार रूपये अनुदान प्राप्त होईल.
सुधारीत शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते, तर या योजनेची अंमलबजावणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते. तरी गरीब शेतकरी आणि शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा आणि अतिरिक्त कर्जाचा बोजा शेतकऱ्यावर पडू नये असा उद्देश या योजने मागील आहे.