साने गुरुजी मराठी निबंध | Sane Guruji Marathi Nibandh |

प्रस्तुत निबंध हा पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा जीवन परिचय होण्यासाठी साने गुरुजी हा मराठी निबंध (Sane Guruji Marathi Nibandh) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

साने गुरुजी मराठी निबंध | Sane Guruji Essay In Marathi |

“श्यामची आई” या आपल्या आईवर लिहलेल्या पुस्तकामुळे साने गुरुजी अजरामर झालेले आहेत. आईचे संस्कार मुलाच्या जडणघडणीत किती महत्त्वाचे असतात, याचा परिचय आपल्याला त्या पुस्तकातून मिळतो. साने गुरुजी हे प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि समाजसेवक होते.

साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने असे होते. ज्या पद्धतीचे जीवन साने गुरुजी जगले त्याचे संपूर्ण श्रेय ते स्वतःच्या आईला देत असत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साने गुरुजींनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. तेथे ते विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील सांभाळत असत. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि शिस्तप्रिय शिक्षणाचे धडे दिले. काही काळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक झाले.

साने गुरुजींनी १९२८ साली “विद्यार्थी” नावाचे मासिक सुरू केले. तसेच ते प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे तत्वज्ञान देखील शिकले. तत्वज्ञानाचा त्यांच्या लिखाणात विधायक परिणाम दिसून येतो. त्यांच्या जीवनावर महात्मा गांधीजींचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी जीवनभर खादी वस्त्रांचाच वापर केल्याचा इतिहास आहे.

गांधीजींच्या प्रभावाखाली त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अनिष्ट रुढी परंपरा यांना साने गुरुजींचा सतत विरोध होता. त्यानंतरच्या समाजसेवी जीवनात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा सहभाग घेतला. त्यामुळे त्यांनी कित्येक वेळा तुरुंगवास देखील भोगला.

नाशिकला तुरुंगवासात असताना त्यांनी “श्यामची आई” या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले तर धुळे येथील तुरुंगात असताना आचार्य विनोबा भावे यांनी सांगितलेली “गीताई” लिहून पूर्ण केली. त्यांचे उत्तरोत्तर जीवन हे एक साहित्यिक म्हणून व्यतित झाले.

साने गुरुजींचं मन अत्यंत संवेदनशील होते. त्यांच्या लिखाणातून ते वारंवार प्रकट होत असे. समाजातील प्रत्येक घटकाप्रती ते कमालीचे भावनाशील होते. साहित्य लेखनाव्यतिरिक्त त्यांचे जीवन समाज कार्यात आरूढ झालेले दिसून येते. खानदेशला त्यांनी आपली कर्मभूमी बनवले आणि समाजकार्य वाढवले.

प्रांतियता, जातीयता आणि धार्मिकता यातील तेढ दूर करण्यासाठी त्यांनी “आंतरभारती” नामक संस्था स्थापण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल त्यांनी आर्थिक आणि सामाजिक सहाय्य देखील मिळवले होते. परंतु ११ जून १९५० रोजी त्यांनी स्वतःचे जीवन संपवल्याने त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या त्यांच्या अजरामर गीताने आजही सर्वांना देशभक्तीची प्रेरणा मिळते. अशा या महान आणि उदार व्यक्तिमत्त्वाचे स्मरण मराठी मन वर्षानुवर्षे करीत राहील, अशी आशा…

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला साने गुरुजी हा मराठी निबंध (Sane Guruji Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment