मृदा प्रदूषण – मराठी निबंध | Mruda Pradushan Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा मृदा प्रदूषण (Mruda Pradushan Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात मृदा प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणे, परिणाम व उपाय याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

मृदा प्रदूषण निबंध | Soil Pollution Essay In Marathi |

मृदा प्रदूषण ही एक नव्याने उद्भवलेली समस्या आहे. जल, वायू आणि प्रकाश यांसारख्या प्रदूषणांचा जमिनीवर विपरीत परिणाम होत असतो. त्याशिवाय, जमिनीत रासायनिक स्वरूपाचा कचरा वाढत चालल्याने देखील मृदा प्रदूषित होत असते. मृदा प्रदूषणामुळे जमिनी हळूहळू नापीक बनत चाललेल्या आहेत.

लोकसंख्या वाढल्याने जगण्यातील स्पर्धा आणि जीवनातील हाव अत्यंत विकोपाला गेलेली आहे. मनुष्याच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची वाढ होत आहे. तेथील रासायनिक कचरा हा वायू आणि द्रव स्वरूपात पर्यावरणात मिसळला जातो. त्या कचऱ्याचा निचरा हा जमिनीत होत असतो.

जमिनीत रासायनिक कचरा मिसळल्याने आपल्याला त्या जमिनीतून शेती अथवा वृक्ष लागवडीची अपेक्षा करता येत नाही. म्हणजेच एकदा का जमीन नापीक बनली की तिचे हळूहळू जैविक व सेंद्रिय घटक कमी होऊ लागतात आणि मातीची धूप सुरू होते. मातीची धूप होणे हा मृदा प्रदूषणाचा अत्यंत घातक असा परिणाम म्हणता येईल.

समाजात कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याने जमिनीवर कचरा क्षेत्र वाढत आहे आणि त्याच कचऱ्यातील विषारी व रासायनिक घटक जमिनीत मिसळले जात आहेत. त्याशिवाय शेतीसाठी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर हा तेथील मातीसाठी घातक ठरतो आहे.

जमीन प्रदूषित होण्याव्यतिरिक्त मातीची धूप होणे ही देखील समस्या गंभीर आहे. जमीन प्रदूषित झाल्याने जमिनीत सेंद्रिय घटक कमी होत जातात. त्याचा परिणाम म्हणून वृक्षांची वाढ होत नाही. शेतजमिनीचे क्षेत्रसुद्धा कमी होत जाते. त्यामुळे जमीन अगदीच उघड्यावर पडल्याने मातीचा थर हा हवेमुळे उडून जात असतो.

मृदा प्रदूषण या समस्येमुळे विविध समस्यांची निर्मिती होऊ लागलेली आहे. जमीन नापीक होणे, मातीची धूप होणे अशा मुख्य समस्यांचा त्यामध्ये समावेश आहे. वृक्षसंख्या अत्यल्प असलेल्या क्षेत्रात पाऊस देखील कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे असे प्रदूषित व नापीक जमीन क्षेत्र हे भविष्यात वाळवंट बनत जात असते.

मृदा प्रदूषित असल्यास त्यामधून उत्पादित झालेले अन्नसुद्धा प्रदूषितच असते. त्यामध्ये पोषक घटक अत्यल्प प्रमाणात आढळतात. अशा अन्नामुळे मानवी स्वास्थ्य देखील लगेच बिघडते. असा एकंदरीत परिणाम पाहता मृदा प्रदूषणावर उपाययोजना करणे गरजेचे बनलेले आहे.

औद्योगिक व रासायनिक कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे, शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर टाळणे, वायू प्रदूषण व जलप्रदूषण रोखणे अशा विविध उपाययोजना मृदा प्रदूषण टाळण्यासाठी करता येऊ शकतात. त्यासाठी सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर जनजागृती होणे गरजेचे आहे.

तुम्हाला मृदा प्रदूषण हा मराठी निबंध (Mruda Pradushan Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment