प्रस्तुत लेख हा मोबाईल – काळाची गरज (Mobile Kalachi Garaj Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात मोबाईलचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट केलेला आहे. त्यानुसार हळूहळू मोबाईल कसा काय काळाची गरज बनत चालला आहे याची सुध्दा चर्चा केलेली आहे.
मोबाईल – काळाची गरज
“मूर्ती लहान पण कीर्ती महान” ही म्हण लहानपणापासून आपण सर्वजण ऐकत आलेलो आहोत. ही म्हण मनुष्यासाठी बनलेली असली तरी मोबाईलसाठी देखील तेवढीच खरी आहे. मोबाईल आज प्रत्येक घराघरात आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला आहे.
३ एप्रिल १९७३ रोजी अमेरिकन अभियंता मार्टिन कूपर यांनी मोटोरोला या कंपनीत अभियंता म्हणून पदभार स्वीकारत असताना वायरलेस कम्युनिकेशन उपकरणे बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, ज्यामुळे जगातील पहिल्या मोबाईल फोनचा शोध लागला. तेव्हापासून मोबाईलमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.
मोबाईलची खरी गरज आणि महत्त्व कोरोना काळात आपल्याला कळालेच आहे. शिक्षण, व्यवसाय, मीटिंग, गेमिंग, सोशल मीडिया अशा सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ आपण मोबाईलवर देखील घेऊ शकतो हे कोरोना काळात सिद्ध झाले. याच काळात तरुणाई व आबालवृद्धांनाही मोबाईलचे व्यसन जडले गेले.
सध्या प्रत्येकाच्या जीवनात मोबाईल हा एक अविभाज्य घटक बनला आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईल हाच एक उत्तम पर्याय आहे. मोबाईलमुळे आपण बँकिंग, ऑनलाईन तिकीट बुकिंग, ऑनलाईन खरेदी – विक्री अशी कामे घरबसल्या सहज आणि सुलभ पद्धतीने करू शकतो.
मोबाईलवर आपण एवढे अवलंबलो आहोत की आपल्या दिवसाची सुरुवात देखील मोबाईल अलार्मनेच होते. घरबसल्या लाईट बिल भरण्यापासून ते किराणामाल आणण्यापर्यंतची सर्व कामे मोबाइलद्वारे केली जातात. एवढेच नव्हे तर मोबाईलद्वारे सध्या जेवणही मागवले जाते.
मोबाईलमुळे माणसाच्या जीवनात पारदर्शकता आलेली आहे. बँकांतील व उद्योग क्षेत्रातील कामे सोपी होऊ लागलेली आहेत. आता पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडत नाही. काही सेकंदात आपण पैसे दुसऱ्या व्यक्तीस पाठवू शकतो. तसेच ऍप पासवर्ड आणि ओटीपी सेवा इत्यादी गोष्टींमुळे आपण आपले बँक खातेही सुरक्षित ठेवू शकतो.
मोबाईलमुळे आपण जगातील सर्व घडामोडींवर सहज लक्ष ठेवू शकतो. विविध देशांतील व्यक्तींशी आपण सहज संवाद साधू शकतो. त्यामुळे कितीही दूर असलेला व्यक्ती हा मोबाईलमुळे दूर वाटत नाही. मोबाईलमुळे आपल्याला घरबसल्या जगातील सर्व बातम्या क्षणार्धात समजतात.
शालेय मुलांसाठी तर मोबाईल म्हणजे एक ज्ञानाचे भांडार आहे. जेवढे मोबाईलमधून ज्ञान घेता येईल तेवढे कमीच आहे. मोबाईलमुळे रेल्वे, सिनेमा यांची तिकिटे काही मिनिटांतच काढता येऊ लागलेली आहेत, त्यासाठी पूर्वीसारखे तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही.
मोबाईलचा लाभ कृषी आणि वैद्यकिय क्षेत्रात देखील होऊ लागलेला आहे. शेतकरी मोबाइलद्वारे आपल्या पिकाचा, मातीचा फोटो तज्ञांकडे पाठवून त्यासंदर्भातील सहकार्य मिळवू शकतात. तसेच मोबाईलमुळे आपण घरातूनच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकतो आणि औषधेही मागवू शकतो.
मोबाईलमुळे माणसाचे जीवन एवढे आधुनिक झाले आहे की मोबाईल हा एक अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारखी माणसाची मूलभूत गरज बनला आहे. मोबाईलशिवाय दिवस व्यतित करणे अत्यंत कठीण झालेले आहे. मोबाईल नसेल तर या तंत्रज्ञानाच्या काळात आपण खूप मागे राहू, कारण मोबाईल ही आता फक्त सोय नाही तर काळाची गरज आहे.
तुम्हाला मोबाईल : काळाची गरज हा मराठी निबंध (Mobile Kalachi Garaj Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…