प्रस्तुत लेखामध्ये मोबाईल आणि कॉम्प्युटरचा अति वापर केल्याने होणारे डोळ्यांचे आजार, कारणे आणि त्यावर उपाय यांवर चर्चा केली आहे. डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, अंधुकपणा अशा समस्यांवर सुरुवातीलाच काळजी घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांचा त्रास सर्व वयोगटातील लोकांना होतोच आहे पण विशेष करून लहान मुलांवर होणारा परिणाम हा नकळत आणि गंभीर आहे. मोबाईल, कॉम्प्युटरचा अनावश्यक वापर टाळून डोळ्यांचे आरोग्य कसे अबाधित राखता येईल, याचा विचार आपण या लेखात करणार आहोत.
Table of Contents
डोळ्यांचे विकार होण्यामागची कारणे –
फक्त तंत्रज्ञान नाही तर तंत्रज्ञानाचा अतिवापर हा डोळ्यांच्या विकारांसाठी कारणीभूत ठरत आहे. माणसाला लागलेले हे एक व्यसनच म्हणावे लागेल.
माणसाची जीवनशैली बदलण्यामागे तंत्रज्ञान जबाबदार आहे, असे म्हणावे लागेल. कॉम्प्युटर आणि मोबाईल यांचा अतिवापर तसेच इंटरनेटमुळे सोशल मिडियाचे लागलेले व्यसन हे डोळ्यांच्या तसेच इतरही शारीरिक, मानसिक आरोग्याला धोका निर्माण करत आहेत.
सर्व वयोगटातील लोकांचा विचार केल्यास कळेल की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईल किंवा संगणक हाताळत आहे. लहान मुले कार्टून्स, गेम्स, ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी सतत मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरत आहेत.
तरुण पिढी सोशल मीडिया, गेम्स, वेब सीरिज आणि चित्रपट यांसाठी मोबाईल वापरते. तर वृद्ध लोक आता तंत्रज्ञान हाताळता यावे म्हणून मोबाईलचा वापर वाढवत आहेत.
या सर्वांचा डोळ्यांवर मात्र घातक परिणाम होत आहे. कारण या पिढीसाठी मोबाईल तंत्रज्ञान नवीन असल्याने त्याचा किती आणि कसा वापर केला पाहिजे याबद्दल समज गैरसमजच खूप आहेत.
मोबाईल आणि कॉम्प्युटरमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम –
• डोळ्यांची जळजळ
मोबाईल, संगणक, एलईडी स्क्रीन, यामधून बाहेर पडणारी किरणे डोळ्यांसाठी घातक असतात. सतत स्क्रीन पुढे डोळे असल्यास सुरुवातीला डोळ्यांची जळजळ होणे हे डोळ्यांच्या विकारातील प्रमुख लक्षण आहे.
• अंधूकपणा / अस्पष्टपणा
सुरुवातीला डोळे जड होणे, जळजळ याकडे जर दुर्लक्ष केले तर काही काळाने डोळ्यांपुढे अंधुकपणा येऊ लागतो. नजरेत अस्पष्टपणा येऊ लागतो. कमी वयातच चष्मा लागू शकतो.
• डोळ्यातून पाणी येणे
डोळ्यांची तपासणी न करता तुम्ही मोबाईल किंवा संगणकाचा वापर चालूच ठेवलात तर डोळ्यातून अधून मधून पाणी येणे, डोळे लाल पडणे अशा समस्या उद्भवू शकतात.
• इतर समस्या –
डोळे सर्वकाही ग्रहण करत असतात. त्यामुळे घातक किरणे देखील डोळ्यांना सहन करावी लागतात. त्यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते, मनावर नियंत्रण राहत नाही. सततची चिडचिड, काल्पनिक भीती, अतिरिक्त घाम येणे, तसेच डोकेदुखी वाढू शकते.
वरील शारीरिक आजारांव्यतिरिक्त मानसिक आजारही बळावत आहेत. लहान मुले, तरुण मुले तर जे मोबाईल आणि कॉम्प्युटरवर दाखवले जाते तेच खरं आहे असं मानतात आणि वास्तविक जीवन काय आहे याचा त्यांना विसर पडतो. पालकांशी, इतर व्यक्तींशी ते नीट बोलत नाहीत, त्यांच्याशी नीट वागत नाहीत. तसेच शारीरिक हालचाल देखील कमी
होऊन त्यांच्यात आळस बळावू लागतो.
डोळ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय –
• ठराविक वेळच मोबाईल, कॉम्प्युटर वापरावा.
• डोळ्यांची तक्रार जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• खेळणे, व्यायाम करणे अशा सवयी लावून घ्याव्यात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन डोळ्यांचे स्नायू स्वच्छ आणि मजबूत होतात.
• मोबाईल, कॉम्प्युटर स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या किरणांपासून संरक्षण होऊ शकेल असे चष्मे, लेन्सेस उपलब्ध आहेत त्यांचा वापर जरूर करावा.
• अभ्यास किंवा स्वतःचं कामच कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर असेल तर अर्ध्या-अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यावा. डोळे स्वच्छ धुवावेत.
वाचकांसाठी आवाहन –
मोबाईल आणि कॉम्प्युटरमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम हा लेख स्वतःचे अनुभव आणि वाचन संदर्भित लेख आहे. उपाय किंवा डोळ्यांची कुठली समस्या आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला सर्वात अगोदर घ्या. तसेच हा लेख आवडल्यास तसेच कुठली चुकी असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.