मराठी राजभाषा दिन – वृत्तांत लेखन | Marathi Rajbhasha Din Vruttant

प्रस्तुत लेख हा मराठी राजभाषा दिनाबद्दल वृत्तांत लेखन (Marathi Rajbhasha Din Vruttant Lekhan) आहे. मराठी राजभाषा दिन हा २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. उपयोजित लेखन प्रकारात या प्रकारचे वृत्तांत लेखन समाविष्ट केलेले असते.

वृत्तांत लेखन – मराठी राजभाषा दिन | Marathi Rajbhasha Din Vruttant Lekhan

सातारा : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रभर २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन (मराठी भाषा गौरव दिन) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या इतर घटकांना मराठी भाषेचे महत्त्व समजावे तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून यावर्षीही विद्या निकेतन शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला.

सकाळी ठीक १० वाजता विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, प्रमुख पाहुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि पालक शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन जाधव सर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास आरंभ केला. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. महेश पवार सर यांच्या शुभहस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका रंजना गायकवाड यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि स्वागतगीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षक – शिक्षिका यांच्या मदतीने शाळेतील मुलांकडून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे प्रसिध्द लेखक श्री. संजय नथुराम खरात यांच्या हस्ते झाले.

या साहित्य प्रदर्शनात निरनिराळ्या विषयांवर आधारित लेख तसेच शाळेतील मुलांकडून लिहिलेले छोटे – छोटे निबंध, सध्या प्रसिद्ध असलेली पुस्तके आणि कवितासंग्रह मांडण्यात आले होते. सचिन जाधव सरांनी पाहुण्यांचे स्वागत करीत मराठी भाषेचे महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबवले.

आपली ओळख असणाऱ्या मराठी भाषेस चालना मिळावी या हेतूने शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी परामणे यांच्या सूत्रसंचालनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम मराठी वेशभूषा केलेल्या शाळेतील चिमुकल्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस वंदन करत मराठी शब्दकोश, ग्रंथ, कादंबरी यांचे पूजन केले आणि बालकविता सादर केली. त्यानंतर मराठी राजभाषा दिनावर शाळेतील काही निवडक विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.

त्यानंतर कुसुमाग्रजांच्या निवडक प्रसिद्ध कविता अखेर कमाई, प्रेम, स्वप्नाची समाप्ती, दूर मनोऱ्यात, सागर – कुसुमाग्रज, आगगाडी आणि जमीन, क्रांतीचा जयजयकार, इत्यादी कवितांचे वाचन तसेच गायन झाले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे कुसुमाग्रजांचे प्रसिद्ध नाटक नटसम्राट! या नाटकातील काही भाग शाळेतील इयत्ता नववीतील मुलांकडून सादर केला गेला. शाळेचे तंत्रज्ञान विभागात काम करणारे शिक्षक विजय सुर्वे सरांनी कुसुमाग्रजांचे जीवनचरित्र आणि त्यांचे मराठी साहित्यातील मोलाचे योगदान यावर आधारित असणारी चित्रफीत दाखवली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र इत्यादी पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट म्हणून दिली. त्याचा स्वीकार शाळेच्या ग्रंथपाल सविता पवार यांनी केला.

सर्व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली.

तुम्हाला मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din Vruttant Lekhan) या विषयावर आधारित वृत्तांत लेखन आवडले असल्यास नक्की तुमचे मत आम्हाला कळवा…

Leave a Comment