चित्ता – मराठी निबंध | Leopard Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी चित्ता (Leopard / Cheetah Essay In Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. चित्ता या प्राण्याचे जीवन, राहणीमान आणि त्याची वैशिष्ट्ये अशा बाबींची चर्चा या निबंधात करण्यात आलेली आहे.

माझा आवडता प्राणी – चित्ता निबंध मराठी | Majha Avadta Prani – Chitta Marathi Nibandh

निसर्गात विविध प्रकारचे जंगली व पाळीव प्राणी अस्तित्वात आहेत. जंगली प्राणी हे मानवाच्या सहवासात राहत नाहीत आणि त्यापैकी बहुतांशी प्राणी जसे की सिंह, वाघ, चित्ता, कोल्हा, लांडगा हे शिकार करून जगतात. त्या प्राण्यांपैकी त्यांचे राहणीमान आणि गुणधर्म पाहता चित्ता हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.

जलद वेगाने धावणारा प्राणी म्हणून चित्ता या प्राण्याची ओळख आहे. कोणत्याही गतिशील वस्तूला किंवा यंत्राला चित्त्याची उपमा दिली जाते. सर्वसाधारणपणे तो मानवाच्या किमान तिप्पट गतीने धावू शकतो. चित्ता हा मार्जार कुळातील एक सस्तन प्राणी आहे.

चित्त्याचे शास्त्रीय नाव ॲकिनोनिक्स जुबेटस (Acinonyx jubatus) असे आहे. भारतीय चित्त्याला आशियाई चित्ता म्हणून देखील ओळखले जाते. सध्याच्या काळात भारतात चित्ता हा प्राणी जास्त संख्येने अस्तित्वात नाही. पूर्वी राजेमहाराजे यांच्या शिकारीच्या छंदामुळे भारतातील चित्ते नामशेष होत गेले.

चित्त्याच्या शरीरावर भरीव काळे ठिपके असतात परंतु त्याच्या पोटावर आणि पायावर असे भरीव काळे ठिपके आढळत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली अश्रुसारख्या दिसणाऱ्या रेषा असतात. त्याचे शरीर हे लांबसडक असते. त्याची छाती खोल, पाय लवचिक आणि डोके लहान असते.

चित्ता हा मांजरासारखा दिसतो. त्याचा आवाज देखील मांजरासारखाच असतो. त्याचे आयुर्मान सरासरी १४ ते १५ वर्षे इतके असते. चित्ता हा सर्व जगभरात वेगाचे प्रतिक मानला जातो. चित्ता हा मांसाहारी प्राणी असून तो सर्वसाधारणपणे हरीण, ससा व झेब्रा या प्राण्यांची शिकार करतो.

चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळी शिकार करतो. तो कितीही वेगाने धावत असला तरी देखील तो त्याच्या शिकारीचा एक ते दीड मिनिट पाठलाग करतो आणि शिकार शक्य नसल्यास तो त्या शिकारीचा पाठलाग सोडून देतो. नर चित्ता हा बहुतेकदा एकटा शिकार करत नाही परंतु मादी चित्ता ही एकटी शिकार करते.

चित्ता गवताळ प्रदेशात किंवा झुडुपात राहणे पसंत करतो. तो उष्ण वातावरणात देखील राहू शकतो. शिकार करत असताना चित्त्याला वेगाने धावणे गरजेचे असते. शिकार करते वेळी तो ताशी १२० किमी वेगाने धावतो. सावज पकडण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी तो शेपटीचा उपयोग करत असतो.

अति उष्णतेच्या वातावरणात चित्ता हा झाडावर वेळ व्यतित करतो. चित्ता हा दिसायला खूप आकर्षक असतो. सिंह अथवा वाघ यांच्यासारखी ताकद चित्त्याकडे नसली तरी त्याची चपळता आणि वेग हा इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक असल्याने चित्ता हा माझा आवडता प्राणी आहे.

तुम्हाला माझा आवडता प्राणी – चित्ता हा मराठी निबंध (Leopard Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment