सध्या डिजिटल शिक्षणाचा प्रसार असल्याने सर्वत्र ऑनलाईन क्लासेस होऊ लागले आहेत. त्यामुळे माझा ऑनलाईन क्लास हा मराठी निबंध (Majha Online Class Essay In Marathi) ऑनलाईन क्लासबद्दल स्वतःचा अनुभव स्पष्ट करणारा असला पाहिजे.
माझा ऑनलाईन क्लास – निबंध | Majha Online Class Marathi Nibandh |
मी सुमित सखाराम पाटील, इयत्ता नववीत शिकत आहे. मागील वर्षीपासून आमचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. इयत्ता आठवीची परीक्षा देखील आम्ही ऑनलाईनच दिली. त्यामुळे मागील वर्षापासूनचा ऑनलाईन क्लासचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.
सुरुवातीला आमचे गणित व विज्ञान हे महत्त्वपूर्ण विषय ऑनलाईन शिकवले जायचे. त्यासाठी शिक्षकांनी रोजची एक वेळ ठरवली आणि क्लासेस सुरू झाले. माझ्या वडिलांनी मला एक वेगळा स्मार्टफोन घेऊन दिला.
सुरुवातीला एकदम वेगळाच अनुभव यायचा. कारण कधीकधी मोबाईल नेटवर्क समस्या तर कधीकधी व्हिडिओ ऍपवर लॉगिन समस्या! अशा समस्या हळूहळू दूर होऊ लागल्या कारण मोबाईल सतत वापरत असल्याने मोबाईल एप्लिकेशन्स आणि इंटरनेट विषयी बऱ्यापैकी ज्ञान झाले होते.
शाळा सुरू होणार नाही म्हणून आमची चाचणी परीक्षा देखील ऑनलाईनच घेतली गेली. तसेच इतर विषय देखील शिकवले जाऊ लागले होते. त्यामुळे मोबाईल, हेडफोन्स आणि वही-पेन घेऊन आम्हाला सतत क्लासला उपस्थित राहावे लागत असे.
विद्यार्थी गैरहजर राहणे अशक्य होते कारण शिक्षक कॉल करून तत्काळ कारण विचारत असत. सुरुवातीला विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस खूप मजेशीर वाटत असत पण वर्गात वास्तविक शिक्षणापेक्षा यामध्ये जास्त लक्ष द्यावे लागत होते.
एकाग्रता कमी पडली की मुद्दा कळणे अशक्यच, कारण आपल्या शेजारी दुसरा विद्यार्थी अथवा आपला मित्र नसतोच! त्यामुळे “पुन्हा सांगा” असे शिक्षकांना बोलताच शिक्षक “झोपलाय का!” असे बोलून खडसावत असत.
सतत मोबाईलचा वापर असल्याने मला आरोग्याची काळजी वाटू लागली होती. कारण माझ्या डोळ्यातून अधून मधून पाणी यायचे. ही समस्या उद्भवताच बाबांनी मला मोबाईल स्क्रीनमुळे डोळ्यांना ईजा होणार नाही असा संरक्षक चष्मा आणून दिला.
शिक्षक शिकवताना काही विद्यार्थी स्वतःचा व्हिडिओ आणि आवाज बंद करून व्यवस्थित शिक्षण घेत नाहीत परंतु त्यांचे भविष्यात खूप नुकसान होईल असे वाटते. कारण ऑनलाईन शिक्षण पद्धतीच यापुढे कार्यरत असणार आहे.
सध्या तर असे वाटते की शाळा या कधीकाळी असायच्या आणि ऑनलाईन क्लास म्हणजेच आमचे इथून पुढचे शिक्षण असणार आहे. ऑनलाईन क्लास आता मला बरा वाटतो कारण शिक्षणाची ही तंत्रज्ञानयुक्त पद्धत निर्माण झाली ज्यामुळे शिक्षणासाठी इतर ठिकाणी जावेच लागत नाही.
माझा ऑनलाईन क्लास हा मराठी निबंध (Majha Online Class Essay In Marathi) तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…