महात्मा गांधी हे एक थोर पुरुष होते. त्यांनी देशभक्तीला अहिंसेचे स्वरूप दिले होते. त्यामुळे समाजसेवा, राजकारण, तसेच अध्यात्म, मानवी गुण संपन्नता या क्षेत्रात आपले जीवन समर्पित करणारे महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना निबंध लिहायला लावतात.

व्यक्तीविषयी निबंध लेखन हा प्रकार विद्यार्थ्यांना हाताळावा लागतो. त्यासाठी व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या निबंधात जास्त कल्पना विस्तार आवश्यक नसतो. मुद्देसूद वाक्यरचना आणि मांडणी आवश्यक ठरते. चला तर मग बघुया, कसा लिहाल महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जीवनावर निबंध !

महात्मा गांधी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi |

महात्मा गांधीजी यांना कोण ओळखत नाही! लोक त्यांना आदराने बापू म्हणत असत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर अहिंसावादी नेते म्हणून बापूंची ओळख होती. गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम बापूंना ‘महात्मा’ ही उपाधी दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून प्रथमतः संबोधले. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा “जागतिक अहिंसा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या संपूर्ण जीवनावर अध्यात्मिकतेचा पगडा दिसून येतो. विविध धर्म ग्रंथांचा त्यांचा अभ्यास हा त्यांच्यासाठी आणि समाजासाठी उपयुक्त होता.

मोहनदास करमचंद गांधी असे बापूंचे संपूर्ण नाव होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्या घरातले वातावरण अध्यात्मिक होते. त्या अध्यात्माचा प्रभाव त्यांच्या पूर्ण जीवनावर दिसून येतो. अहिंसा, सहिष्णुता, दयाभाव, सत्यनिष्ठा असे गुण त्यांच्या आयुष्यात आढळतात.

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदरमध्ये तर माध्यमिक शिक्षण राजकोटमध्ये झाले. शैक्षणिक जीवनात ते हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिकची परीक्षा ते भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून पास झाले. मोहनदास गांधी यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर झाला. पुढे त्यांना चार अपत्ये झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी त्यांच्या मुलांची नावे होत.

महात्मा गांधी हे अहिंसा आणि असहकार या तत्त्वांचे पुरस्कर्ते होते. ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा अभ्यास करत असताना तेथील भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसा आणि असहकार या मार्गांचा अवलंब केला. आफ्रिकेत असताना कृष्णवर्णीय म्हणून झालेली अवहेलना त्यांना सहन झाली नाही आणि ते इ.स.१९१५ मध्ये भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी समाजसेवा सुरू केली.

गांधीजींनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. पुढे इ.स. १९२१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर देशव्यापी चळवळी त्यांनी उभ्या केल्या. यामध्ये सर्वधर्म समभाव, आर्थिक स्वावलंबन, खेड्यांचा विकास, स्त्रियांचे हक्क, गरिबी निर्मूलन अशी महत्त्वाची धोरणे होती. पुढे इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात पायी चालत सुमारे चारशे किलोमीटर दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो भारतीयांचा सहभाग होता.

हरिजनांच्या उद्धारासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. साबरमती आश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित या सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा ‘कुटिर उदयोग’ त्यांना महत्वाचे वाटत असत. स्वदेशीचा पुरस्कार म्हणून त्यांनी साधी राहणी स्वीकारली. स्वतःच्या वस्त्रांत आणि आहारात त्यांनी बदल केला. स्वच्छता आणि साधेपणा त्यांना आवडत असे.

इ.स. १९४२ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारत छोडो म्हणजेच “चले जाव” हे आंदोलन सुरू केले. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचे स्वरूप हे अहिंसात्मक असायचे. त्यामुळे ते अनेकवेळा उपोषणालाही बसले. संपूर्ण भारत देश, सर्वधर्मी लोक व नेते हे त्यांचे अनुयायी होते. काही जहालमतवादी नेत्यांचा गांधीजींना विरोध होता पण तो विरोध राजकीय होता. व्यक्तिगतदृष्ट्या ते नेतेदेखील गांधीजींचा आदर करत असत. पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

लोकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी ते नेहमीच आग्रही असत. स्वतःच्या जीवनात अनेकवेळा तुरुंगवास त्यांनी सहन केला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर झालेले अन्याय त्यांना सलत होते. गांधीजी हे उत्तरोत्तर आत्मशुद्धी आणि शरीरशुद्धीसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांचा आयुष्यभर निष्ठेने अवलंब केला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here