प्रेम – Love
प्रेमाची व्याख्या सुरुवातीला स्पष्ट करून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजपर्यंत आपण प्रेम हे फक्त चित्रपट आणि मालिकेतून पाहत आलेलो आहोत. त्यामध्ये अवास्तव जे काही दाखवले जाते त्याची थोडीदेखील रूपरेखा वास्तविक जीवनात आढळत नाही.
कोणी तसा वागण्याचा किंवा प्रेम करण्याचा प्रयत्न केला तरी तसे प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही. आपला नैसर्गिक स्वभाव काही दिवसांनी बाहेर येतोच. त्यामुळे आपण करत असलेले प्रेम हे कोणत्या पद्धतीत आहे ते पाहिले पाहिजे. ते फक्त आकर्षण आहे की खरोखर आकर्षण आणि भावना सुद्धा आहेत.
तुम्ही ज्या वयात आहात त्याप्रमाणे प्रेमाची व्याख्या असते. किशोरवयीन मुलासाठी प्रेम हे फक्त शरीरातील होणारे बदल आणि हार्मोन्सचे आक्रमण असते म्हणजेच शारिरीक आकर्षण असते. परंतु ती फक्त सुरुवात असते. प्रेमाची अनुभूती ही प्रत्येक वयात बदलत जाते.
तरुण वयात आल्यावर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक स्तरावर सोबत देऊ शकेल असा साथीदार हवा असतो. तेव्हा फक्त शरीर महत्त्वाचे नसते तर मन आणि भावना देखील बघितल्या जातात. त्यामुळेच लग्नाच्या बंधनात देखील दोघे अडकतात.
लग्नानंतर कुटुंब जबाबदारी आणि पुढची पिढी सांभाळणे यामध्ये कर्तृत्त्व आणि प्रेम या दोन्ही गोष्टी झळकतात. त्यामुळे तेथे प्रेम म्हणजे इतर व्यक्तींचा सांभाळ, कुटुंबाची जबाबदारी, स्वतःचा विकास अशा गोष्टी असतात.
या सर्व स्तरांमध्ये आपल्याला अनुभव घ्यावा लागतो की आपली ओळख ही फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आत्मिक देखील आहे. तर आणि तरच खऱ्या प्रेमाचा अनुभव आपल्याला येऊ शकेल.
आपण फक्त शारीरिक आकर्षणातून प्रेमाची व्याख्या करत असू तर नक्कीच जीवनात कधीच प्रेम उमलणार नाही. कारण शारिरीक स्तरावर आपण जोडले जाणे हे काही क्षणासाठी असते त्यानंतर तो व्यक्ती तेवढा आकर्षक भासत नाही किंवा आपली वासना आणि मन इतरत्र उड्या मारत राहते.
प्रेमाचा असा संदर्भ हा केवळ जीवन त्रासदायक बनवतो त्यातून स्वतंत्रता कधीच जाणवत नाही. तर एकमेकांप्रती केवळ घृणा, ईर्ष्या यांचीच वाढ होते. नाते आणि प्रेमापेक्षा मग अहंकार मोठा होतो. एकमेकांचा वापर तर केला जातो पण प्रेमाचा सुगंध तेथे दरवळत नाही.
स्वतंत्रता – Freedom
प्रत्येक जीवनाची उत्स्फूर्त इच्छाच अशी असते की तो स्वतंत्र असावा. त्यासाठी जीवनाचा ज्वलंत आणि जिवंत अनुभव घेणे आवश्यक आहे. प्रत्येक जिवाप्रती, निसर्गाप्रती संवेदनशील बनत जाणे हे सर्वप्रथम घडले पाहिजे. तरच आपण प्रेम अनुभवू शकू आणि तीच स्वतंत्रतेची सुरुवात असू शकते.
प्रेम युक्त असल्यास समोरील व्यक्ती अत्यंत आदरयुक्त भासतो शिवाय स्वतःचे जीवन हे फक्त नात्यांतील जबाबदारीचे कर्म नसून ती एका मोठ्या आणि उत्तुंग जीवनाची शक्यता देखील आहे याची जाणीव होत राहते. त्यामुळे संवेदनशील बनणे हे प्रेमाची अनुभूती होण्यासाठी गरजेचे आहे.
स्वतंत्र असणे म्हणजे एकटे राहणे व कोठेही फिरणे नव्हे तर आपण जन्मल्यापासून स्वतंत्र आहोतच याची सूक्ष्म जाणीव प्रत्येक क्षणी होत राहणे. अशा जाणिवेतून इतर जीवांना देखील आपली काय सहाय्यता होऊ शकते हे जबाबदारी पार पाडण्याततून शिकणे.
सध्या जसे आपण जीवन अनुभवत आहोत त्यामध्ये आनंददायी अनुभवाची वाढ करत राहणे. त्यासाठी स्वतंत्र आयुष्यात प्रेम केले जाऊच शकते. नाहीतर दुसरे काय करणार!
महत्त्वाचे मुद्दे –
• प्रेम हे शारिरीक, मानसिक आणि आत्मिक स्तरावर अनुभवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा अनुभव देखील त्या त्या स्तरांवर पोहचवणे.
• आपण एक स्वतंत्र अस्तित्व आहोतच याची जाणीव होण्यासाठी संवेदनशील बनत जाणे.
• संवेदनशील बनल्यावर सर्व अस्तित्वावर तुम्ही प्रेम करू शकाल. मगच खरी स्वतंत्रता अनुभवू शकाल.
• स्वतंत्र आयुष्यातच प्रेमाची खरी अनुभूती होऊ शकते.
• शारिरीक आकर्षण कायम टिकणारे नसते. मानसिक आकर्षण ही काही काळानंतर कंटाळवाणे ठरते. त्यानंतर आत्मिक अनुभूती हीच प्रेमासाठी अत्यावश्यक होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक वयात प्रेमाची अनुभूती वेगवेगळी असते.
• प्रेम जास्त महत्त्वाचे की स्वतंत्रता? याचे उत्तर म्हणजे हळूहळू प्रेमामार्फत स्वतंत्रता अनुभवत जाणे.