फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का?

‘तिळगुळ घ्या गोड बोला’ हे वाक्य सर्वजण पाठ करून आहेत. मकर संक्रांतीला तिळगुळ वाटताना बोलले जाणारे हे वाक्य फक्त त्या दिवशीच सार्थकता निर्माण करते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला जाणार आहे.

माणूस हा आपल्या स्वभावाप्रमाणे जगत असतो. परंतु बाहेरील परिस्थितीत त्याचे वागणे बदलत असते. प्रत्येक वेळी एकाच प्रकारची वागणूक राखणे शक्य होत नसते. आपण इतरही लोकांच्या संपर्कात येत असल्याने आपली वागणूक बदलत असते.

आपला स्वभाव मात्र निश्चित राहत असतो. आपण आतून कसे आहोत हे त्यामार्फत कळत असते. आपण आनंदी राहावे असे प्रत्येकाला वाटते परंतु आनंदाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्याने आनंद मिळेलच याची मात्र निश्चित ग्वाही देता येत नाही.

खऱ्या आनंदाचे आणि उत्साहाचे मानकरी व्यक्ती नेहमीच गोड भासतात. तर आनंदाच्या खोट्या संकल्पना मनात ठेऊन आणि अहंकाराला दुजोरा देणाऱ्या व्यक्ती या आपल्याला कटू स्वभावाच्या भासत राहतात.

मनात प्रेम आणि आनंद असेल तर गोडवा जाणवतोच. याउलट मनात घृणा, ईर्ष्या असेल तर मात्र स्वभावात कटुता जाणवते शिवाय अशा व्यक्तींचा गोडवा हा फक्त अभिनय मात्र असतो. अशा खोट्या जगण्याचा त्रास हा त्यांचा त्यांनाच होत असतो.

सुख, समाधान, आनंद अशा गोष्टी बाहेरील जगात न शोधता अंतरंगात शोधाव्या लागतात. त्या एकदा सापडल्या की आपण खऱ्या अर्थाने गोड स्वरुपात व्यक्त होत असतो. त्यामध्ये अभिनय नसतो. आतून कटुता आणि बाहेरून गोडवा अशा वागणुकीने आपण जीवन चालवत नसतो.

या संक्रांतीला किंवा प्रत्येक सणाला, एवढेच नाही तर प्रत्येक दिवशी आपण दुहेरी भूमिकेतून सामोरे न जाता एका समग्रतेने, उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे. तरच आपण दररोज स्वभावात गोडवा निर्माण करून आपले जीवन आनंदी बनवू शकू.

या मकर संक्रांतीला सर्वांना वास्तविक आनंदाची दिशा सापडावी. स्वकर्माने जीवनात समाधान निर्माण व्हावे. परिणाम स्वरूप म्हणून नेहमीच गोडवा निर्मित व्हावा. तो आतून बाहेरून अभिव्यक्त व्हावा. फक्त संक्रांतीलाच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तो झळकावा.

Leave a Comment