प्रस्तुत लेख हा माझे आवडते फूल जास्वंद (My Favourite Flower Hibiscus Essay In Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. जास्वंद फूलाविषयी सर्व स्वरूपाची प्राथमिक माहिती या निबंधात देण्यात आलेली आहे.
माझे आवडते फूल – जास्वंद निबंध | Majhe Avadte Ful – Jaswand Nibandh |
निसर्गात आपल्याला विविध फुलांचे सौंदर्य अनुभवायला मिळत असते. गुलाब, कमळ, मोगरा, जाई – जुई, चमेली, झेंडू, शेवंती अशी अनेक प्रकारची फुले आपल्याला परिसरात आढळतात. फुलांचे रंग, सुगंध आणि स्पर्श यावरून आपल्याला विशिष्ट प्रकारची फुले आवडत असतात. त्यापैकी माझे आवडते फूल हे जास्वंद आहे.
जास्वंद हे आशिया खंडात आढळणारे प्रमुख फुलझाड आहे. जास्वंदाचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोसा सायनेसिस असे आहे. जास्वंद फुलांचा रंग लाल असतो तर काही ठिकाणी पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या व निळ्या रंगाची देखील जास्वंदाची फुले आढळतात. जास्वंद झाडाची पाने हिरव्या रंगाची आणि पसरट असतात.
जास्वंद ही एक सदाहरित वनस्पती असून तिची लागवड अत्यंत सहज पद्धतीने होऊ शकते. जास्वंदीची उंची जास्तीत जास्त पंधरा फूट असू शकते. अत्यंत प्राचीन काळापासून जास्वंदाचे अस्तित्व पृथ्वीवर आहे. जास्वंद फुलाचा वापर आयुर्वेद, नैसर्गिक रंग निर्मिती आणि विविध प्रकारच्या पूजा विधिंमध्ये होत असतो.
जास्वंद फुल हे आकाराने मोठे असून या फुलाला पाच पाकळ्या असतात. काही विशिष्ट जातीच्या फुलांमध्ये पाकळीवर पाकळी अशा स्वरूपाची रचना असते. फुलाच्या मध्यभागी पुयुग्म आणि स्त्रीयुग्म हे एका दांडीवर असतात. या फुलाचे परागकण पिवळ्या रंगाच्या छोट्या पिशव्यांमध्ये बंदिस्त असतात.
सध्या कलमी रोपे उपलब्ध होत असल्याने जास्वंदीच्या देखील विविध प्रजाती निर्माण करण्यात यश मिळालेले आहे. एकाच झाडावर जास्वंदीची फुले मोठ्या संख्येने वर्षभर येत असतात. जास्वंदीच्या फुलापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. तसेच फुलांच्या पाकळ्या वाळवून कागद देखील बनवला जाऊ शकतो.
जास्वंद फूल हे अत्यंत तजेलदार फूल असल्याने त्याची लागवड परिसराची, अंगणाची आणि बागेची शोभा वाढवण्यासाठी केली जाते. जास्वंदीची फुले सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जातात तसेच त्याच्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा देखील बनवला जातो. त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो.
जास्वंदीच्या झाडाला फळे नसतात. झाडाच्या फांदीपासूनच नवीन रोपे तयार करावी लागतात. जास्वंद वनस्पतीला जास्त पाण्याची गरजही नसते. आपण या फुलाची लागवड कुंडीत देखील करू शकतो. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या अंगणात जास्वंद आढळते.
जास्वंद हे फुल विशेषकरून गणपती देवाला अर्पण केले जाते. अनेक आयुर्वेदीक उपचार पद्धतीत जास्वंदीची फुले आणि पाने यांचा वापर केला जातो. अशा प्रकारे दिसायला एकदम ताजे, टवटवीत आणि पसरट पाकळ्या असणारे जास्वंद हे माझे आवडते फूल आहे.
तुम्हाला माझे आवडते फूल जास्वंद हा मराठी निबंध (Hibiscus Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…