प्रस्तुत लेख हा इंदिरा गांधी (Indira Gandhi Essay In Marathi) यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात हा निबंध लिहावा लागतो. अत्यंत समर्पक आणि स्पष्ट शब्दांत हा निबंध मांडण्यात आलेला आहे.
इंदिरा गांधी – निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh |
भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरात झाला. त्यांना देशसेवेचे बाळकडू लहानपणीच वडील जवाहरलाल व आई कमला नेहरू यांच्याकडून मिळाले होते.
इंदिराजींचे प्राथमिक शिक्षण अलाहाबादमध्ये तर पुढील शिक्षण पुणे, मुंबई आणि गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये झाले. त्यांचे कुटुंब राजकीय घडामोडींनी वेढलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर राजकारणाचा जोरदार प्रभाव पडला.
इंदिरा गांधी यांनी तरुण वयातच काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. भारतातील गरिबी, दारिद्र्य, आणि निरक्षरता या बाबी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे भविष्यात भारत हे जगातील संपन्न आणि सामर्थ्यशाली राष्ट्र व्हावे ही त्यांची सुप्त इच्छा होती.
इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा गांधी असे होते तर त्यांना राजीव आणि संजय अशी दोन मुले होती. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले. लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या.
गरिबी, भूक, अज्ञान दूर करण्याकरिता त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. शेती-उद्योग, अंतराळ संशोधन, अणुशक्ती या क्षेत्रांत भारताला पुढे नेण्यासाठी त्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. त्या निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केली.
इंदिरा गांधी हे एक महान महिला नेतृत्व होते. त्यांची हुशारी आणि राजकीय कार्यक्षमता याचे सर्वजण कौतुक करत असत. १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना होत्या.
ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला गेला होता. परंतु त्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या करण्यात आली. अशा या महान महिला नेतृत्वासाठी भारतीय जनता नेहमीच ऋणी राहील.
तुम्हाला इंदिरा गांधी हा मराठी निबंध (Indira Gandhi Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)