ऐकणे ही एक कला आहे. आपले संपूर्ण अस्तित्व ऐकण्यात मग्न झाले पाहिजे तर आणि तरच आपण ऐकण्याचे महत्त्व (Importance of Listening) जाणून घेऊ शकू. प्रस्तुत लेखात ऐकण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगण्यात आलेले आहे.
Table of Contents
ऐकणे म्हणजे काय? What is Listening?
संपूर्ण अस्तित्वानिशी ऐकणे म्हणजे एकप्रकारे ज्ञान झाल्यासारखे आहे. आपले संपूर्ण ध्यान जर एका गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्याला ती गोष्ट सहज समजते. संपूर्ण लक्ष देऊन ऐकणे ही एक प्रकारची साधना आहे.
ऐकणे ही प्रक्रिया संपूर्णपणे समजून घेण्यासाठी प्रतिक्रिया काय असते हे प्रथम आपल्याला समजले पाहिजे.
आपण दिवसभर प्रतिक्रिया देण्यात व्यस्त असतो. जे ऐकतो, बघतो त्यावर सतत आपले विचार चालू राहतात आणि आपण प्रतिक्रिया देत राहतो. लहानपणी आपली बुद्धी आसपास घडणारे सर्वकाही ग्रहण करत असते. चांगले की वाईट हा फरक आपल्याला तेव्हा कळत नसतो.
मोठे झाल्यावर देखील आपण सभोवतालचे प्रसंग आणि घटना ग्रहण करतच असतो पण त्यावर आता नियमित विचार प्रक्रिया चालू असते आणि त्यावर आपली प्रतिक्रियासुद्धा ठाम असते. ती बरोबर की वाईट याचा विचार आपण करत नाही.
एकदा का प्रतिक्रिया दिली की झालं, आपलं काम संपलं! असंच सर्वजण नकळत मानत असतात. हे असे का घडत असावे?
कारण आपल्या स्मृतीमध्ये जे काही साठवले जाते त्याला आपण ज्ञान मानतो. त्या ज्ञानाने आपला अहंकार वाढत जातो. आपले प्रत्येक गोष्टीबद्दल मत तयार होत जाते. ते मत म्हणजेच प्रतिक्रिया!
ही प्रतिक्रिया लहानपणी संस्कारित झाल्याने आपल्या विकासासाठी आणि अंतर्बाह्य बदलासाठी अडथळा ठरू शकते, हे प्रथम समजले पाहिजे. कारण माणूस म्हणून आयुष्याच्या सर्व दिशांचा आणि शक्यतांचा शोध घेणे हे आपले कर्तव्यच आहे.
सर्वप्रथम प्रतिक्रियेचा स्वभाव कसा बदलू शकतो, याचा विचार करुयात. प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलताना काहीतरी बोलावंच लागतं. परंतु ते बोलणे व्यवस्थितरित्या नसते. आपल्या पूर्व समजुती, संस्कार, आणि मतं त्यामध्ये प्रविष्ट होत राहतात.
समोरचा बोलत असतो आणि त्यामध्ये त्याचे म्हणणे समजून न घेता आपलंच मत त्याला सांगून मोकळे होतो. हे सर्वप्रथम थांबवले पाहिजे. समोरचा बोलताना त्याच्या पूर्वग्रहातून बोलत असतो. त्यामुळे आपलं मत हे आपण आपल्या पूर्वग्रहातून देणार असतो. त्यामुळे प्रतिक्रिया देण्याअगोदर शांत बसणे अत्यावश्यक आहे.
परिस्थिती समजून घेणे आणि मग बोलणे –
सर्वप्रथम बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे. शांत बसल्यानंतर समोरचा काय बोलत आहे आणि कोणत्या उद्देशाने बोलत आहे ते आपल्याला हळूहळू जाणवू लागेल. काहीवेळा व्यक्ती व्यर्थ बडबड करत असते आणि त्याला आपल्या उत्तराशी काहीएक देणंघेणं नसतं, अशावेळी जर प्रतिक्रिया दिली तर आपणच मूर्ख ठरतो.
त्यामुळे शांतपणे ऐकून घेतल्यावर समोरच्याचा अचूक अंदाज आपल्याला येऊ लागतो मग आपलेही बोलणे आणि प्रत्येक गोष्टीत मत मांडणे गरजेचे राहत नाही. आपण मग तेच बोलतो जे परिस्थितीला आणि प्रसंगाला धरून असेल, आपले पूर्वग्रह त्यामध्ये मांडले जात नाहीत.
काहीजणांना तुमचे मत खरोखर आवश्यक वाटत असेल तर ते स्वतः बोलल्यानंतर थोडा वेळ शांत बसतील आणि तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतील. त्यावेळी तुम्ही त्याची पूर्ण परिस्थिती, वास्तविकता समजून घेऊन योग्य प्रतिक्रिया किंवा मत देऊ शकता.
व्यवस्थित ऐकण्याचे फायदे – Benefits of Listening
✓ गोष्टी समजण्याची आणि जाणून घेण्याची क्षमता वाढते.
✓ व्यक्ती सजग आणि समजूतदार बनत जाते.
✓ विद्यार्थी शिक्षणात हुशार बनत जातो.
✓ बोलण्याचा आणि बोलणाऱ्याचा हेतू समजतो.
✓ योग्य प्रतिक्रिया दिली जाते.
✓ मन एकदम शांत राहते.
✓ विचार आणि भावना यांचा योग्य मेळ साधला जातो.
✓ विवेक जागृत होतो. व्यर्थ अंधश्रद्धा पाळली जात नाही.
✓ बोलण्यात व्यर्थ ऊर्जा खर्च होत नाही.
✓ आयुष्य संवेदनशील, करुणामय बनत जाते.
शब्दांपलिकडचे ऐकणे –
सुरुवातीला जसे सांगितले की ऐकणे ही एक कला आहे. म्हणजेच एकदा का आपण प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देणे टाळत गेलो तर आणि तरच ऐकण्याची कला योग्यरीत्या विकसित होऊ शकते.
आता आपण जेव्हा जागे असू, काही काम करत असू, तेव्हा फक्त ऐकणे हे एकमेव आंतरिक कार्य चालू असते. अशा स्थितीत विचारही थांबवले जातात कारण विचार करणे, विचार मनात येणे या गोष्टी म्हणजे आपली स्मृती आणि कल्पनाच असते.
योग्य ज्ञान ग्रहण होणे तसेच वास्तविक जीवनाचा अनुभव होणे यासाठी अतिसूक्ष्म संवेदना आवश्यक असते ज्यामध्ये शब्द, भाषा आणि विचारापलिकडे ऐकणे होत असते. अशा ऐकण्याने जीवनाचा अत्यंत सुखद अनुभव येऊ लागतो.
तुम्हाला ऐकण्याचे महत्त्व (Importance of Listening) लेख आवडला असल्यास नक्की कमेंट करा… तुमच्याही काही सूचना असल्यास आम्हाला नक्की कळवा….