माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध | Majhe Kutumb Majhi Jababdari|

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व स्पष्ट करणारा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा मराठी निबंध (Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh) विद्यार्थ्यांना लिहावा लागतो.

माझे कुटुंब माझी जबाबदारी | Majhe Kutumb Majhi Jababdari Essay In Marathi

कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असल्याने आणि त्यावर योग्य उपचार पद्धती न मिळाल्याने जगभरात आता स्वतःची काळजी स्वतः घेण्याची वेळ आलेली आहे. कोरोना विषाणूची साखळी संपूर्णतः तोडण्यासाठी कुटुंबाची जबाबदारी देखील घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.

कुटुंबातील एक व्यक्ती जर कोरोनाबाधित झाला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कोरोना चाचणी आणि त्यानंतर होणारा मानसिक त्रास यातून सर्व कुटुंब त्रासच सहन करत आहे. त्यामुळे सुरुवातीला कुटुंबातील प्रत्येक जण जबाबदारीने वागला तर कोरोनाची लागण कोणालाच होणार नाही.

महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात योजलेल्या उपाय आणि धोरणांपैकी एक म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे अभियान! स्वतःच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबातील सर्वजण कोरोना बाधित होऊ शकतात, याची जाणीव होण्यासाठी व पर्यायी काळजी घेण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

कोरोना हा विषाणू संसर्गजन्य असून त्यामुळे ताप, खोकला व श्वसनमार्गात अडथळा या समस्या निर्माण होतात. अशी लक्षणे जर बहुतांश लोकांमध्ये दिसून आली तर मात्र चिंतेचे वातावरण तयार होईल. याअगोदरच जगभरात कोरोनामुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत.

त्यामुळे सरकारने आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे तसेच कुटुंबातील इतरांनाही त्या सूचनांचे पालन करायला लावणे ही आपली नैतिक जबाबदारी झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी पोलिस व आरोग्य तपासणी यंत्रणा यांना योग्य ते सहकार्य करणे आवश्यक आहे.

एक कुटुंब जर कोरोनामुक्त आयुष्य जगत असेल तर पर्यानाने समाज, राज्य आणि देश देखील कोरोनामुक्त होईल असा विश्वास सर्वांच्या जगण्यात आणि वागण्यात असला पाहिजे. आपले नातेवाईक आणि आप्तेष्ट यांना जर कोरोना लागण झाली तर स्वतःसाठी तो आर्थिक व मानसिक संघर्ष असेल.

माझे कुटुंब माझी जबाबदारी यांतर्गत आपल्याला फक्त आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारायची आहे. स्वतःची व कुटुंबाची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे. ज्यामध्ये नियमित व्यायाम करणे आणि चांगला चतुरस्त्र आहार घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचे सर्व पायाभूत नियम जसे की मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, आणि एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर पाळणे देखील गरजेचे आहे. कोरोना विरोधात आता लस उपलब्ध झालेली आहे. लसीकरण, आरोग्य काळजी आणि उपाययोजना यांचा लाभ घेऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान आपल्याला यशस्वी करून दाखवावे लागेल.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझे कुटुंब माझी जबाबदारी (Majhe Kutumb Majhi Jababdari) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment