येत्या २९ नोव्हेंबरला गर्ल्स हा चित्रपट येणार आहे. मुलींची चर्चा आणि त्यांचे भावविश्व अशी काहीशी कथा असलेला हा चित्रपट एका वेगळ्याच वादात सापडला आहे. आयुष्यावर बोलू काही असं नाव वापरून या कार्यक्रमाची थट्टा करण्यात आलेली आहे असं सलील यांचं वक्तव्य आहे. गर्ल्स चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अंकिता नामक अभिनेत्री असभ्य वर्तन करताना दिसत आहे आणि तिचा टीशर्ट हाच वादाचा खरा मुद्दा बनला आहे.
FamilySucks हा हॅश टॅग आणि आयुष्यावर बोलू काही, असं प्रिंट केलेला टी-शर्ट परिधान करून अश्लील हालचाली करणे हे अजिबात योग्य नाही, असं सलील यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ हे सलील कुलकर्णींच्या कार्यक्रमाचं नाव आहे. हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध आहे. आयुष्यातील काही नात्यांमध्ये भावना जपणारा हा कार्यक्रम आणि त्याची केली गेलेली अशी अवहेलना सलील यांना मान्य नाही.
याबाबतीत त्यांची फेसबुक पोस्ट अशी ”नाती, आई-बाबा, घर या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा- आयुष्यावर बोलू काही. आपल्या या कार्यक्रमाबद्दल हा आदर? गेली सोळा वर्षे हाऊसफुल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान? काय विचार असेल यात? मी, संदीप खरे, आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ आणि मित्रमंडळी असे आम्ही सर्वजण याचा तीव्र निषेध करतो.”