निसर्गाची सर्वात कोमल आणि सुंदर प्रतिकृती कोणती असेल तर ती म्हणजे फुल! फुलांचे उपयोग आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करणारा फुल हा मराठी निबंध (Flower Essay in Marathi) प्रस्तुत लेखात देण्यात आलेला आहे.
फुले – निसर्गाची अनमोल देणगी | Essay On Flower In Marathi |
फुले ही निसर्गाची मानवासाठी बहुमूल्य देणगी आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी साैंदर्य जाणले त्यांनी फुलांचा नेहमीच गौरव केलेला आहे. फुले ही अस्तित्वाची अगदी कोमल आणि नाजूक स्थिती आहे.
प्रेम, प्रार्थना आणि भक्ती अशा मानवी जीवनातील अत्युच्च दिशांना स्पर्श करणाऱ्या भावनांमध्ये फुलांचा समावेश नेहमीच असतो. सण-समारंभ आणि उत्सव अशा मंगल प्रसंगी फुलांचा वापर सर्रास होत असतो.
फुलांमुळे मानवी जीवनात आणि निसर्गात रंग भरले जातात ज्यामुळे प्रत्येक जण जाणिवेच्या सुगंधाने भरला जातो. फुलांमुळे स्वतःची दृष्टी तर सुंदर होतच असते शिवाय त्याचे अस्तित्व आपल्याला एवढे आकर्षक भासते की त्यांना आपण प्रत्येक मंगल प्रसंगी देवाप्रती वाहत असतो.
आपण आसपास निरीक्षण केले तर आपल्याला विविध स्वरूपाची आणि वेगवेगळ्या रंगांची फुले आढळतात. काही फुले मिश्र रंगांनी युक्त अशी असतात. तसेच प्रत्येक फुलाचा सुगंध हा वेगळ्या प्रकारचा असतो. सुगंध आणि रंगानुसार प्रत्येकाचे आवडते फुल हे वेगवेगळे असते.
लेखक, कवी, चित्रकार व संगीतकार यांना तर फुले ही अप्रतिम भासतात कारण त्यांच्या कलेचे प्रकटीकरण हे फुलांशिवाय उत्तमरित्या होऊच शकत नाही. फुलांना नेहमीच औदार्य, समर्पण, साैंदर्य आणि कलेचे प्रतिक मानले गेले आहे.
फुलांचा उपयोग तसा विरळच, तरीही नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आणि अत्तर बनवण्यासाठी फुलांचा उपयोग केला जातो. काही फुलांचा औषधीप्रमाणे देखील वापर होऊ शकतो तसेच सुगंधी तेल बनवण्यासाठी सुद्धा फुलांचा वापर केलेला आपल्याला आढळतो.
सुगंधी अगरबत्ती आणि धूप तयार करण्यासाठी फुलांच्या अर्काचा उपयोग केलेला असतो. अशा प्रकारची अगरबत्ती लावल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जाते. स्त्रियांचे उपवास असताना, पूजा-अर्चना तसेच यज्ञ पूर्ण झाल्यानंतर देवाचरणी अर्पण करण्यासाठी फुलांचा वापर हा अगदी प्राचीन काळापासून होत आला आहे.
स्त्रिया फुलांचा उपयोग केसांत माळण्यासाठी करतात. मोगरा, गुलाब अशा फुलांना तर त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त आहे. लग्न कार्यात, वास्तू शांतीवेळी अथवा देवांना हार तयार करताना झेंडूच्या फुलांचा वापरसुद्धा प्रचलित आहे.
फुलझाडे आपण कुंडीत किंवा घराच्या अंगणात लावू शकतो ज्याने आपल्या घराच्या आसपासचा परिसर मोहक फुलांनी सुगंधित आणि नयनरम्य होऊन जातो. झेंडू, गुलाब, मोगरा, जाई – जुई, शेवंती, जास्वंद, कमळ अशी अनेक प्रकारची फुले निसर्गात सहज उपलब्ध आहेत.
फळझाडांना फळे येण्याअगोदर फुलेच येतात, त्यांचीच परिणिती नंतर फळांमध्ये होते. मधमाश्या फुलांतील मकरंद गोळा करून मध तयार करतात. त्याच मधाचा मानवी आरोग्यासाठी होणारा फायदा आपल्याला सर्वज्ञात आहेच.
आपल्या घरी जी फुलझाडे असतील त्यांचा सुगंध आणि सहवास आयुष्यभर विसरता येत नाही. आपल्या जाणिवेत फुलांचे अस्तित्व असते परंतु त्यांचा उपयोग आणि महत्त्व सहज कळून येत नाही. अशा प्रकारे रहस्यमयी अस्तित्व दर्शविणारे हे फुल ही निसर्गाची अप्रतिम कलाकृती म्हणता येईल.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला फुल हा मराठी निबंध (Flower Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…