प्रस्तुत लेख हा शहरातील जीवन (Shaharatil Jivan Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. शहरातील राहणीमान उंचावले असल्यामुळे तेथील विकास हा झपाट्याने पाहायला मिळतो. त्यामुळे लोक तेथे आयुष्य व्यतित करणे पसंद करतात.
शहरात राहण्याचा उद्देश्य, फायदे आणि तोटे अशा बाबींचे स्पष्टीकरण या निबंधात करायचे असते. या निबंधात अतिशयोक्ती न करता शहरातील जीवनाचे वास्तविक वर्णन करणे अपेक्षित असते.
शहरी जीवन निबंध | Life In a City Essay In Marathi |
लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रत्येक ठिकाण हे वस्ती, गाव, निमशहर आणि शहर म्हणून विकसित होत असते. त्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणाला शहर असे संबोधले जाते. लोकसंख्येची घनता आणि जगण्याची स्पर्धा जास्त असल्याने शहरातील जीवन हे गतिमान आणि विकसित समजले जाणारे जीवन आहे.
शहर निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. सांस्कृतिक, औद्योगिक आणि नैसर्गिक संपन्नता उपलब्ध असल्याने अन्य गावे आणि निमशहरी भागातील लोक शहरांकडे आकर्षित होत असतात. जगण्यातील सुव्यवस्था आणि सुविधा राखण्यासाठी शहरी जीवन हे उपयुक्त असे जीवन आहे.
शहरात लोकसंख्या जास्त असल्याने उद्योगधंदे भरपूर प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी लोक शहरांत स्थलांतर करत असतात. तसेच शहरात शिक्षण, कला – क्रीडा, उद्योग, दळणवळण, पर्यटन अशा विविध स्तरांवर प्रत्येक व्यक्तीला जीवन घडवण्याची संधी निर्माण होत असते.
शहरातील जीवन हे सर्वांना हवेहवेसे वाटते कारण शहरी विकास हा आपण प्रसार माध्यमांतून किंवा लोकांच्या तोंडून नियमित ऐकत असतो. जगण्याची सोय आणि सर्वच क्षेत्रांतील स्पर्धा अगदी उन्नत प्रकारे असल्याने शहरात आर्थिक भरभराट होतच गेलेली आहे.
शहरात अन्न, वस्त्र आणि निवारा या बाबी सहजच आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने मिळवता येतात. आरोग्य व सरकारी यंत्रणा या तत्परतेने कार्यरत असतात. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा लगेच होत असतो. अशा प्रकारे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर शहरात कशाचीच टंचाई भासत नाही.
शहरात दळणवळण आणि प्रवास या सेवा कमालीच्या विकसित झालेल्या आहेत. रेल्वे, विमान, बस, टॅक्सी व रिक्षा अशा सेवा अत्यंत नियोजन पद्धतीने चालू असतात. हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, सांस्कृतिक दालने आणि सिनेमा घरे अशी ठिकाणे विरंगुळा म्हणून लोकांना अतिशय आकर्षित करत असतात.
शहरी राहणीमान हे विकसित आणि आधुनिक मनुष्याचे जीवन असल्याचे मानले जात असल्याने शहरातील विकास हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी जीवनाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. लोकसंख्या अति घनतेमुळे सहज जीवनात देखील स्पर्धा निर्माण झाल्याने जगण्यात ताणतणाव निर्माण झालेला आहे.
जल व्यवस्थापन, वृक्ष आणि निसर्ग संवर्धन अशा गोष्टी शहरात उत्तम झालेल्या आढळत नाहीत. त्यामुळे मनुष्य हा शहरात गेल्यावर त्याचा निसर्गाशी संपर्क तुटतो. वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिक विकासामुळे वाढलेले तापमान यांमुळे लोक आरोग्याच्या समस्या वारंवार भोगत असतात.
ज्या लोकांना जगण्यातील व्यस्तता आवडत नाही त्यांना शहरी जीवन आवडणार नाही. याउलट मात्र ज्यांना आधुनिक आणि सुविधापूर्ण राहणीमान आवडत असेल ते लोक नक्कीच शहरात आपले जीवन जगतील. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेचा विचार करूनच शहरातील जीवन जगावे.
तुम्हाला शहरातील जीवन (Shaharatil Jivan Marathi Nibandh) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…