प्रस्तुत लेख हा बोली भाषा आणि प्रमाण भाषा (Boli Bhasha Ani Praman Bhasha) यामधील फरक स्पष्ट करणारा आहे. बऱ्याच वेळा आपण भाषा वापरताना चुका करतो किंवा चुका करणे टाळतो. त्या दोन्हीतील फरक समजून घेऊन आपण उत्तमरित्या भाषेचा वापर करून संवाद साधू शकतो.
बोली भाषा – Boli Bhasha
संपूर्ण देशात विविध भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात देखील पूर्वपिढीपासून अनेक भाषा बोलल्या जात आहेत. मराठी असे नाव जरी आपल्या भाषेला असले तरी अनेक वेळा इतर महाराष्ट्रातील भागात फिरल्यावर असे जाणवते की एकच भाषा कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते.
“आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!” बोली भाषा ही कशीही बोलली जाते. त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि काही शब्द हे परंपरागत तर काही शब्द आक्रमित असू शकतात.
दैनंदिन जीवनातील व्यावहारिक भाषेला आपण बोली भाषा म्हणू शकतो. ज्या सत्ता एखाद्या प्रदेशावर अधिराज्य गाजवत असतात त्यांच्यामुळे बोली भाषेत थोडा थोडा फरक जाणवलेला दिसून येतो. पूर्वी आपल्यावर मुस्लिम त्यानंतर इंग्रज राज्य करून गेले त्यामुळे अनेक इस्लामिक, पारसी, इंग्रजी शब्द नकळत आपण बोलतो.
आता तर इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्यासारखं आहे. त्याचा आपल्या शिक्षणातही समावेश आहे. त्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की मराठी भाषेत इंग्रजी भाषेतले शब्द येणारच! आत्ताचे सर्व विद्यार्थी हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेंचा वापर एकत्र करताना दिसतात.
प्रमाण भाषा – Praman Bhasha
काळानुरूप साहित्य आणि शिक्षण निर्मिती होत असते त्यासाठी प्रमाण भाषा वापरावी लागते. अशा भाषेच्या निर्मितीसाठी सर्वमान्य असतील असे शब्द आणि त्यातून भाषा निर्मिती करणे गरजेचे होऊन जाते. बहुतेकदा प्रमाण भाषा आणि बोली भाषा एकत्रच अस्तित्वात असतात.
शिक्षण निर्मिती झाल्यावर त्यासाठी एखादी भाषा प्रमाणित करावी लागते. त्यातील शब्द सर्व विद्यार्थ्यांना समजले पाहिजेत आणि त्याचे आकलनही झाले पाहिजे. प्रसिद्ध लेखक आणि कवी यांचे साहित्य व त्यामध्ये वापरलेली भाषा ही प्रमाणित ठरू शकते कारण लेखकांचे संपूर्ण ज्ञान हे भाषाधिष्ठीत असते.
बोली भाषेला कमी प्रतीची न हिणवता प्रमाणित भाषेचा प्रचार शिक्षणाद्वारे व्यवस्थित होत गेला तर आपल्याला हवा असलेला फरक दिसून येईल, नाहीतर संस्कृत भाषेसारखे अनुभव येतील. पूर्वी प्राचीन काळी सर्वत्र संस्कृत भाषा ही प्रमाण भाषा होती. सर्व पांडित्य आजदेखील संस्कृत भाषेत आहे. परंतु त्या भाषेची समज सध्या समाजातील बहुतांशी लोकांना नाही.
पुस्तके किंवा साहित्य वाचताना जी भाषा वाचली जाते त्याचा संबंध बोली भाषेशी जुळत नाही. त्यासाठी प्रमाण भाषा बोलली जाणे हे जास्त बुद्धिमत्तेचे प्रतिक मानू नये कारण आपण जे बोलतो तेच आपल्याला शिकवले गेले आहे. त्यासाठी प्रत्येक भाषेचा आदर आणि सन्मान करणे गरजेचे आहे.
बोली भाषा शिक्षणात वापरली गेली नसल्याने आपल्याला शिक्षणात संवेदना आणि भावना जाणवत नाहीत. बोली भाषेतून जास्त आपलेपणा आणि गोडवा अनुभवता येतो, तेवढा गोडवा प्रमाण भाषेत जाणवत नाही.
सांगायचा अर्थ एवढाच की प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही प्रमाण भाषा नसते पण आता सर्वत्र एकसाथ जर शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आले तर बहुतांश लोकसंख्या एकसारखी भाषा बोलू शकेल.
तुम्हाला बोली भाषा आणि प्रमाण भाषा (Boli Bhasha ani Praman Bhasha) हा लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…