जस जशी निवडणुक जवळ येत आहे तस तशी जागावाटपाची उत्कंठा वाढतच आहे कारण मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्ष प्रवेशांमुळे जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. परंतु यावर भाजप ने एक उपाय सुचवला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे.
भाजपने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या असून, स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या काळात शिवसेनेने साथ दिल्याने आता विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका भाजपने स्वबळावरच लढवाव्यात, अशी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते. मात्र लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मेगाभरतीने भाजपचे काही वरिष्ठ नेते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरीत आहेत.
शिवसेनेने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मात्र, सध्या १२२ जागी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. शिवसेनेने १२० जागा लढवाव्यात, मित्र पक्षांना १२ जागा द्याव्यात व स्वत:कडे १५६ जागा ठेवाव्यात, असा फॉर्म्युला भाजपने तयार केला असून, तसा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने त्यांच्या जागांची भाजपला अदलाबदल हवी आहे.
जागावाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटाला मात्र स्वबळावर लढूनही भाजप सत्ता स्थापन करील, असे वाटत असून, एकट्याने निवडणूक लढवण्याची हीच वेळ असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शब्द दिलेला असल्यानेच युतीधर्म पाळावा लागणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असल्यामुळे युती होईलच, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे.
सौजन्य- महाराष्ट्र टाइम्स