अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून भाविकांची तुडुंब गर्दी उसळून आली. त्यामध्ये प्रामुख्याने राम दर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलल्लाच्या एकूण सहा आरत्या केल्या जातील. पहिली आरती पहाटे साडे चार तर शेवटची आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल. भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन सकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध असेल.
सर्वात अगोदर शृंगार आरती ही पहाटे साडे चार वाजता घेण्यात येईल. त्यानंतर मंगला आरती ही सकाळी साडे सहा वाजता घेण्यात येईल. भोग आरती दुपारी बारा, संध्या आरती रात्री साडे सात, पुन्हा एकदा भोग आरती रात्री आठ, तर सर्वात शेवटी शयन आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल.
आरती आणि दर्शन घेण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने सर्व भाविकांना दर्शन सहज उपलब्ध झालेले आहे. तसेच सध्या एका नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत.