आज बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार याचा वाढदिवस. राज हरिओम भाटिया ते बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा त्याचा प्रवास जेवढा संघर्षमय आहे तेवढाच तो प्रेरणादायक सुद्धा आहे. सुमारे १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या अक्षय कुमारला भारतातील बऱ्यापैकी प्रत्येक सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
२०१६ साली आलेल्या त्याच्या “रुस्तम” या सिनेमासाठी त्याला “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा” राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला.
अक्षय कुमारचा जन्म अमृतसर पंजाब येथे झालेला असून त्याचे वडील भारतीय सैन्यात होते. अक्षय कुमारला लहानपणापासूनच कराटे शिकण्याची आवड. त्यामुळे ब्लॅक बेल्ट मिळाल्यानंतर मार्शल आर्ट शिकण्यासाठी त्याने बँकॉक गाठले. थायलंडमध्ये असताना बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याने काही काळ हॉटेलमध्ये शेप व वेटर म्हणून काम केलं. तसेच थायलँड मधून भारतात परतल्यानंतर त्याने कोलकत्ता शहरातील एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये सुद्धा काम केले.
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याला सिनेसृष्टी मध्ये येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. एवढेच काय तर त्याने जेव्हा मॉडलिंग सुरू केले तेव्हा एका फर्निचरच्या शोरूम मध्ये मॉडेल म्हणून काम करू लागला. काही काळ त्याने मोबदला न घेता सुद्धा काम केले. तसेच भारतातील एक प्रसिद्ध फोटोग्राफर कडे सुद्धा त्याने कसलेही पैसे न घेता 18 महीने काम केले.
अक्षय कुमारने त्याच्या सुरुवातीच्या काळात काही सिनेमासाठी बॅकग्राऊंड डांसर म्हणून सुद्धा काम केले. एकेदिवशी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार बंगलोरला असताना वेळेच्या गफलतीमुळे त्याचे विमान त्याच्या आधीच निघून गेले. आता काय करावं हा प्रश्न समोर असताना त्याने आपलं नशीब बॉलीवूड मध्ये आजमावण्याचा निश्चय केला आणि निराश झालेला अक्षय कुमार आपल्या फोटोचा अल्बम घेऊन बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांच्याकडे गेला. त्यांना तो अल्बम एवढा आवडला की त्यांनी अक्षय कुमारला त्यांच्या दिदार या सिनेमासाठी प्रमुख भूमिकेसाठी घेतले. आणि त्याचा अभिनेता म्हणून प्रवास सुरु झाला.
म्हणतात ना, “जो होता है अच्छे के लिये होता है” काही असच त्याच्यासोबत सुद्धा घडलं…
यानंतरचा त्याचा हा सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास हा सगळ्यांना माहीत आहे. आजच्या काळातील एका सिनेमासाठी सर्वात जास्त पैसे घेणारा अभिनेता ते सर्वात जास्त सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या या भारतीय सिनेमातील योगदानामुळे त्याला भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरविले. तसेच आशिया खंडातील नावाजलेला “द एशिअन” अवॉर्ड सुध्दा त्याला देण्यात आला आहे.
लवकरच अक्षय कुमारचा हाउसफुल ४, लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशराज फिल्म्स ने आगामी “पृथ्वीराज” हा सिनेमा अक्षय कुमार बरोबर पुढच्या दिवाळीत प्रदर्शित होईल असे जाहीर केले.
अशाच या देशी सुपरस्टारला आमच्या टीम तर्फे “वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा”
हे सुद्धा वाचा- “साहो” ने केलं निराश, कथा आणि Review वाचून तुम्हीही व्हाल…