प्रस्तुत लेख हा वटपौर्णिमा (Vatpournima Nibandh Marathi) या सणावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात वटपौर्णिमा सण कसा साजरा केला जातो याचे वर्णन केले आहे तसेच या सणाचे महत्त्व देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे.
वटपौर्णिमा निबंध मराठी | Vatpournima Essay In Marathi |
वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला असणाऱ्या या सणादिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे याकरिता स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करतात.
पतीची दीर्घायुषी कल्पना व वडाच्या झाडाचे पूजन ही एक प्रथा म्हणून साजरी केली जात असली तरी त्यामागे निसर्गाप्रती व आपल्या सांसारिक आयुष्याप्रती देखील कृतज्ञतेचा भाव आहे. भारतीय परंपरेत अशी कृतज्ञता ही सांस्कृतिक सण – समारंभातून पूर्वीपासून व्यक्त केली जाते.
वडाचा जीवन काळ हा खूप मोठा आहे तसेच तो आपल्याला स्वच्छ हवा प्रदान करत असतो. त्यामुळे त्याची तोड न होण्यासाठी व पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व कळून येण्यासाठी प्रथेनुसार वडपूजन केले जाते. त्याशिवाय आपला पती हा वडाप्रमाणे दीर्घायुषी व स्वस्थ असावा अशी देखील मनोकामना वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांद्वारे केली जाते.
वटपौर्णिमेच्या काळात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत तीन दिवस उपवास पकडला जातो. तसे शक्य न झाल्यास पौर्णिमेच्या दिवशी उपवास धरला जातो. या काळात व्रतासाठी प्रतिकात्मक मानल्या जाणाऱ्या सावित्रीच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला पुजले जाते. त्यानंतर सावित्रीची कथा ऐकली जाते व वटसावित्री धार्मिक व्रत पूर्ण केले जाते.
वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पहाटे लवकर उठतात. सर्व स्त्रिया मनोभावे सावित्री व इतर देव देवतांना पूजतात. त्यानंतर घरातील छोटी – मोठी कामे आटोपल्यानंतर स्त्रिया हळदी कुंकवाचे ताट तयार करून वडाचे पूजन करण्यास घराबाहेर पडतात. त्यावेळी हळदी – कुंकू, फळ, नैवेद्य, एखादी परिधान केलेली वस्तू अथवा दागिना वडाला अर्पण केला जातो.
वडाला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्याला धागा गुंडाळला जातो. धागा गुंडाळल्यानंतर स्त्रिया वडाला नमस्कार करून घरी परततात. घरी सर्वांसाठी गोड जेवण बनवले जाते. तसेच ज्या स्त्रियांनी उपवास पकडला आहे त्या रात्री आपला उपवास सोडतात. समाजातील धार्मिक धारणा व पर्यावरणविषयक सखोल दृष्टी यांचा मेळ या पौर्णिमेला साधला जातो.
वडाचे झाड हे सभोवतालच्या वातावरणासाठी अत्यंत पोषक असते. ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन वायू उत्सर्जित करते. ऑक्सिजन हा मानवी शरीरासाठी प्राणवायू असल्याने परिसरात वडाचे झाड असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचे पूजन होणे हे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत गरजेचे आहे.
सावित्रीचे व वडाच्या झाडाचे पूजन करणे, पौर्णिमेच्या काळात उपवास पकडणे, पतीसाठी दीर्घायुष्याची मागणी करणे अशा प्रकारच्या प्रथा वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण केल्या जातात. वटपौर्णिमा हा सण साजरा करून सर्व स्त्रिया आपला पती व आपल्या पर्यावरणाविषयी समर्पित भाव जोपासतात.
तुम्हाला वटपौर्णिमा हा मराठी निबंध (Vatpournima Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…