प्रस्तुत लेख हा जागतिक वृक्ष दिनाबद्दल वृत्तांत लेखन आहे. जागतिक वृक्ष दिन हा २७ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. उपयोजित लेखन प्रकारात वृत्तांत लेखन समाविष्ट केलेले असते.
जागतिक वृक्ष दिन – वृत्तांत लेखन | Jagtik Vruksh Din – Vruttant Lekhan |
महाबळेश्वर (सातारा): २७ सप्टेंबर हा जागतिक वृक्ष दिवस म्हणून पुर्ण जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत विद्या निकेतन शैक्षणिक संकुलातर्फे जागतिक वृक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ठीक ७:०० वाजता सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख अध्यक्ष, पालिकेचे प्रमुख अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मा. श्री. प्रकाश बनसोडे सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. विद्येची देवता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन पाटील सर यांनी सर्व मुलांना वृक्षांचे महत्त्व सांगितले. वर्तमान आणि भविष्यकाळातील झाडांची गरज समजावून सांगितली.
या वेळी उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना शाळेकडून वृक्ष भेट देण्यात आले. अखेर शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री. मनोज जोशी सरांनी उपस्थित सर्व पाहुणे तसेच मंडळींचे आभार मानले.
सकाळी ११:०० वाजता वृक्षदिंडी काढून सर्व शहरात लोकांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता ८ वी – ९ वीच्या वर्गातील मुलांनी वृक्षतोडीमुळे होणारी हानी नाटकाद्वारे प्रदर्शित केली. शाळा व शहरातील परिसरात एकूण ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच गतवर्षी जगलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली.
जागतिक वृक्ष दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांना कार्यक्रमाच्या शेवटी सन्मानित करण्यात आले. अंततः वृक्ष जोपासना आणि लागवडीच्या कामाचा प्राथमिक आराखडा तयार करून वृक्षदिनाची सांगता करण्यात आली.
अशाप्रकारे शाळा व शहरातील सर्व लोकांनी सहभागी होत वृक्षदिवस मोठ्या उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा केला.
जागतिक वृक्ष दिन (Jagtik Vruksh Din – Vruttant Lekhan) या विषयावर आधारित वृत्तांत लेखन तुम्हाला आवडले असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नोंदवा…