प्रस्तुत लेख हा मला पंख असते तर (Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. पक्ष्यांना जसे पंख असतात तसेच जर स्वतःला पंख असते तर काय झाले असते? या कल्पनेचा विस्तार या निबंधात करायचा असतो.
मला पंख असते तर…
मागच्या आठवड्यात आमची सहल चंपक अरण्यात गेली होती. तेथे निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहून आम्ही एकदम दंगच झालो. अगदी घनदाट झाडी आणि पक्ष्यांचे थवेच्या थवे! त्यांचा तो कलकलाट आणि त्यांचे मनसोक्त विहरणे! अशा सर्वांचा परिणाम म्हणून फक्त पक्ष्यांचे उडणेच माझ्या लक्षात राहिले.
तेव्हापासून मला एक कल्पना नेहमी विचारात येत आहे ती म्हणजे मला पंख असते तर! मला पंख असते तर मी नेहमी आसमंतात उडत राहिलो असतो. निळ्याभोर आकाशाला काही क्षणांतच गवसणी घातली असती. ढगातून प्रवास करत इतर पक्ष्यांना देखील सोबत घेऊन उडाण करीत मस्त मजेत जगलो असतो.
मी उडता उडता विमान व हेलिकॉप्टर यांना खूप जवळून पाहिले असते. मी दररोज आकाशातून पृथ्वीचे सौंदर्य अनुभवले असते. इतर मनुष्य आणि प्राणी मला खूप छोटी – छोटी दिसली असती. नद्या-समुद्र, जंगले, गाव-शहर आणि डोंगर-पठार अशा संपूर्ण सृष्टीचा मनमुराद आनंद स्वतःच्या डोळ्यांनी घेतला असता.
मला पंख असते तर इतर लोकांनाही त्याचा लाभ झाला असता. लोकांनी माझ्याकडून पटापट कामे करवून घेतली असती. चालणे, धावणे या कृती उडण्यापेक्षा जलद गतीने होत नाहीत आणि इतर वाहनांना देखील प्रवासात खूप वेळ लागतो. परंतु मला पंख असल्याने काही मिनिटांतच मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचलो असतो.
मला पंख असते तर कोणत्याही उंच टेकडीवर आणि झाडांवर मी सहजरीत्या पोहचलो असतो. माझ्यासाठी झाडांवर चढून फळे खाणे अत्यंत सोप्पे झाले असते. मला प्रवासात कोणत्याच वाहनांचा उपयोग झाला नसता. तसेच माझा कोणत्याही प्रकारचा अपघात होणेही अशक्य झाले असते.
पंख असल्यावर मी शाळेतून लगेच घरी येऊ शकलो असतो तसेच शाळेत लवकर पोहचलो देखील असतो. परंतु मला पंख असते तर इतर मुलांप्रमाणे खेळता आले नसते. माझे मित्र माझ्यापासून तुटले असते. मी एकटाच त्यांच्यापेक्षा काहीसा वेगळा दिसलो असतो. मनुष्याचे जसे राहणीमान आहे तसे मला राहता आले नसते.
माझे अस्तित्व हे मानवी आहे. त्यामुळे माझी सर्व कृती आणि भावना ही मनुष्याप्रमाणेच विकसित होणार आहे. जर खरोखर मला पंख असते तर मानवी विकासात नक्कीच अडथळा निर्माण झाला असता. मला पंख असण्याचे फायदे आणि तोटे पाहता माझा उपयोगच जास्त होईल परंतु माझ्या सहज जीवनाची शक्यता खूप कमी होईल.
निसर्गाने प्रत्येक प्रकारच्या सजीवाला वेगवेगळे शरीर बहाल केलेले आहे. त्यानुसारच त्यांचे जीवन अगदी सुंदर घडू शकते अन्यथा जीवनात कटू अनुभवच जास्त असतील. पक्ष्यांना पंख असल्याने त्यांचे राहणीमान वेगळे असते. मानवाला पंख नाहीत मात्र बुद्धी, मन आणि भाषा अशा विविध प्रकारच्या सुविधा व कला त्याच्याजवळ आहेत.
माणूस म्हणून माझे जीवन अस्तित्वात असल्याने मला मानवाप्रमाणेच जगायला आवडेल. त्यानुसारच जो काही शारिरीक आणि मानसिक विकास असेल तो करावासा वाटेल. त्यामुळे पंख असते तर मला उडण्याची आणि स्वच्छंदपणे जगण्याची मुभा मिळाली असती खरी, परंतु मानवी विकास शक्य होऊ शकला नसता.
तुम्हाला मला पंख असते तर हा मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…