लता मंगेशकर – मराठी निबंध | Lata Mangeshkar Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा लता मंगेशकर (Lata Mangeshkar Essay In Marathi) यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे बालपण, गायनातील कारकीर्द आणि मिळालेले पुरस्कार यांबद्दल संक्षिप्त माहिती या निबंधात दिलेली आहे.

लता मंगेशकर – मराठी निबंध | Lata Mangeshkar Marathi Nibandh

गानकोकिळा, गानसम्राज्ञी, क्वीन ऑफ मेलोडी अशा विविध उपाधिंनी प्रसिद्ध असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर या एक महान भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. तब्बल सात दशके चित्रपट संगीत क्षेत्रात अविश्वसनीय कारकीर्द घडवणाऱ्या लतादीदींचा राजकारण, कला – क्रीडा आणि गायन क्षेत्रातील लोकांवर खूप मोठा प्रभाव होता.

लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. त्यांना सर्वजण लतादीदी या नावाने ओळखत असत. लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर या शहरात झाला. त्यांचे मूळगाव गोव्यातील मंगेशी हे होते. लतादीदींच्या आईचे नाव शुद्धमती (माई) आणि वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर असे होते.

लतादीदींना आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर अशी एकूण चार भावंडे आहेत. वडील मास्टर दीनानाथ हेच लतादीदींचे संगीत गुरु देखील होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी आपले वडील दीनानाथ यांच्या संगीत नाटकांत बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

लतादीदी अवघ्या तेरा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरातील सर्वात मोठी मुलगी म्हणून त्यांच्यावर आई आणि भावंडांची जबाबदारी आली. सुरुवातीला अभिनय आणि संगीत नाटकांत नशीब आजमावत लतादीदींनी इ. स. १९४२ पासून खऱ्या अर्थाने पार्श्वगायन क्षेत्रात स्वतःची कारकीर्द सुरू केली.

लतादीदी स्वतः गायिका असल्याने त्यांच्या सर्व भावंडांना त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. लतादीदींनी जवळजवळ प्रत्येक भारतीय भाषेत गाणी गायलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाण्यांचा समावेश होता. प्रत्येक दशकातील महान संगीतकारांसोबत त्यांनी काम केलेले होते.

संगीतातील असामान्य कामगिरीमुळे लता मंगेशकर यांना भारत सरकारचे पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे अत्यंत मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार आणि “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट” या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

लतादीदी आयुष्यभर एकदम साध्या पेहरावात वावरल्या. तसेच त्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत देखील नेहमी सहभागी असायच्या. लतादीदींनी सन २००१ मध्ये लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनद्वारे पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.

लतादीदींनी तब्बल सात दशके संगीत क्षेत्रात अतुल्य कामगिरी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्रोत आणि आदर्शवत गायिका ठरलेल्या आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला लतादीदींचा सार्थ अभिमान आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अशा या महान गानसम्राज्ञीचे मुंबईत निधन झाले.

तुम्हाला लता मंगेशकर हा मराठी निबंध (Lata Mangeshkar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment