कोरोनानंतर शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | Corona nantar shalecha pahila divas |

प्रस्तुत लेख हा कोरोनानंतर शाळेचा पहिला दिवस (Corona nantar shalecha pahila divas Marathi Nibandh) हा मराठी निबंध आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कोरोनानंतर शाळेतील पहिल्या दिवसाचे अनुभव या निबंधात व्यक्त करायचे असतात.

कोरोनानंतर शाळेचा पहिला दिवस निबंध | A Day In a School After Corona Essay In Marathi |

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या. तब्बल दीड वर्षे शाळा बंद असल्याने शाळेत जाणे जरा नवीनच वाटत होते. शाळेत जाणे म्हणजे पुन्हा एकदा दफ्तर आणि डब्याची आवराआवर, गणवेश इस्त्री, बुटांची साफसफाई, अशी एक ना अनेक कामे होतीच!

शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर जाग आली. सकाळची सर्व कामे आटोपल्यानंतर मी पुस्तके, कंपास आणि वह्या दफ्तरात भरल्या. त्यानंतर व्यवस्थित गणवेश इस्त्री करून ठेवला. आईने जेवण बनवून ठेवलेले होते. मी फक्त डबा भरला आणि शाळेची तयारी करून शाळेत जायला निघालो!

शाळेत गेल्यावर सर्व जुने शिक्षक नवीन भासत होते. सर्व विद्यार्थी मित्र थोडे मोठे झाल्यासारखे वाटत होते. रोजचा परिचय नसल्याने शाळेतील इतर कर्मचारी वर्ग थोडा वेगळाच भासत होता. आम्ही विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा भेटल्याने सर्वजण खूप आनंदात होतो.

शाळेचा पहिला दिवस सुरू झाला परंतु कोरोना विषयी सर्व काळजी बाळगूनच वर्ग भरवण्यात आला. सुरक्षित अंतर ठेवून वर्गात बसणे, एकमेकांना स्पर्श न करणे, मास्कचा वापर, नियमित हात धुणे, असे काही नवीन नियम लागू करण्यात आलेले होते.

शाळेची वेळ ही नियमित नव्हती. प्रमुख तीन विषयांचे तास झाल्यानंतर दुपारी एक सुट्टी झाली. त्या सुट्टीत जेवण करणे असा नियम होता. सुट्टी संपल्यावर पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आले. त्यानंतर भाषेचे विषय शिकवले गेले.

शिक्षकांची शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी वाटत होती कारण त्यांनीही दीड ते दोन वर्षे ऑनलाईन तासच घेतलेले होते. पहिला दिवस असल्याने सुधारित अभ्यासक्रम, परीक्षेचे आणि शाळेचे वेळापत्रक, तसेच कोरोनाचे नवीन नियम समजवण्यात बहुतांश वेळ गेला.

कोरोना असल्याने स्वतःचे पाणी स्वतः आणावे असा नियम नव्याने जोडला गेला. त्याशिवाय पहिल्याच दिवशी असे समजले की सत्र परीक्षा या पुढील महिन्यातच असतील. त्यामुळे सर्व स्वाध्याय आणि गृहपाठ लवकर पूर्ण करणे गरजेचे होते, म्हणजेच पुन्हा एकदा अभ्यास आणि लिखाणाची दिनचर्या सुरू झाली होती.

भाषेचे सर्व विषय शिकवल्यानंतर शाळा सुटली असे जाहीर करण्यात आले. शाळा सुरू झाली पण नवीन नियम त्यामध्ये लागू केले गेले. प्रार्थना, खेळ, आणि सहभोजन या गोष्टी मात्र नक्कीच वगळल्या गेल्या होत्या. त्यामुळे कोरोनानंतर शाळेचा पहिला दिवस हा कोणत्याही उपक्रमाविना फक्त पुस्तकी विषय शिकण्यात गेला.

तुम्हाला कोरोनानंतर शाळेचा पहिला दिवस (Corona nantar shaletil pahila divas Marathi Nibandh) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment