साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने मानवी जीवनात नैतिकता आणि सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. अशा साक्षरतेचे महत्त्व समजण्यासाठी विद्यार्थ्यांना साक्षरता दिन हा मराठी निबंध (Saksharta Din Marathi Nibandh) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा हा निबंध!
जागतिक साक्षरता दिन – मराठी निबंध | Saksharta Din Essay in Marathi |
संपूर्ण जगभरात ८ सप्टेंबर रोजी साक्षरता दिन साजरा केला जातो. लोकांनी साक्षर होऊन स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा विकास करावा, असा महान उद्देश्य ठेवून हा दिवस साजरा केला जातो.
माणूस साक्षर झाल्यापासून त्याची प्रगती निश्चितच झालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झालेले आहे. दैनंदिन जीवन सुधारले आहे. जगण्यातील आणि वागण्यातील गुणवत्ता बदलली आहे.
साक्षरतेची गरज आणि महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघटनेने १७ नोव्हेंबर १९६५ या दिवशी “८ सप्टेंबर” हा दिवस “जागतिक साक्षरता दिन” म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानंतर १९६६ साली प्रथमच साक्षरता दिन साजरा करण्यात आला.
देशातील अशिक्षित लोकांना अशा प्रकारे शिक्षित बनवले पाहिजे की त्यांना प्राथमिक अक्षर ओळख होऊ शकेल आणि ते सहजरित्या लिहू – वाचू शकतील. त्यासाठी सध्या “साक्षर भारत मिशन” देखील राबवले जात आहे.
कोणत्याही देशाची प्रगती तेथील साक्षर लोकांमुळे होत असते. साक्षर समाज नेहमीच विवेकपूर्ण पद्धतीने आणि नैतिकदृष्ट्या विकसित होत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात साक्षरतेचे महत्त्व जागवण्यासाठी साक्षरता दिनी शाळेतील मुलांकडून देखील घोषवाक्ये देखील दिली जातात.
वयस्कर लोकांना साक्षर बनवणे आणि सर्व लहान मुलांना योग्य शिक्षण देणे हा महत्त्वपूर्ण उद्देश्य साक्षरता दिनानिमित्त साधला जातो. वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगती करायची असेल तर देशात कोणीही निरक्षर राहता कामा नये.
समाजात साक्षरता रूजल्याने दैनंदिन जीवन एकदम सुखकर बनत जाते. शासनाच्या योजना समजतात, स्वतःबरोबर कौटुंबिक विकास कसा साधता येईल याची समज वाढते. म्हणजेच लोकांचे राहणीमान आणि वैचारिक दृष्टिकोन उंचावत जातो.
नागरिक साक्षर झाल्याने त्यांना कोणीही गुलाम बनवू शकत नाही. त्यांना कोणी फसवू शकत नाही. त्यामुळे सामाजिक स्थिरता आणि समानता लाभू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्वप्न रुजू शकते.
भारतात बहुसंख्य लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. सध्याची लहान मुले आणि तरुण पिढी व्यवस्थित शिक्षण घेत आहे. त्याचा परिणाम म्हणून साक्षरतेचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुढेही संपूर्ण देश साक्षर बनेल असा निर्धार आपण साक्षरता दिनी करूयात आणि त्यादृष्टीने प्रयत्नशील राहूयात.
तुम्हाला साक्षरता दिन हा मराठी निबंध (Saksharta Din Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…