भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाबद्दल माहिती होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा निबंध (Dr. Babasaheb Ambedkar Marathi Nibandh) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr. B R Ambedkar Essay In Marathi |
भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचे नेते, कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते. त्यांचे संपूर्ण नाव भिमराव रामजी सकपाळ असे होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे हे होते.
मध्यप्रदेशमधील महू या ठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असताना त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले. लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर रामजी साताऱ्यात नोकरीसाठी आले आणि तिथेच स्थायिक झाले.
त्याकाळी एखाद्या ठिकाणी स्थायिक झाल्यावर कोकणातील लोक आपल्या गावावरून आपले आडनाव ठेवत असत त्यामुळे त्यांच्या आंबडवे गावावरून आंबेडकर हे आडनाव ते लावू लागले. भिमराव रामजी आंबेडकर या आपल्या नावाने त्यांनी साताऱ्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. याच काळात त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. पुढे १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या प्राप्त केल्या.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी केली आणि त्यानंतर मुंबईत सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. परंतु या काळात त्यांना अस्पृश्य म्हणून खूप हिणवण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून द्यायचे ठरवले.
मुंबईत १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. जनजागृतीचे काम सुरू असतानाच त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. १९२३ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.एससी. ही पदवी प्राप्त केली. माघारी आल्यानंतर त्यांनी मुंबईत वकीली सुरू केली. त्यानंतर १९२४ मध्ये दलितांच्या हक्कांसाठी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.
कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या तळ्यावर अस्पृश्यांना देखील पाणी भरता यावे म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्याग्रह केला आणि त्या विरोधात सनातनी लोकांनी भरलेला खटला जिंकून अस्पृश्यांना हक्क प्राप्त करून दिला.
आंबेडकर १९३० मध्ये गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. त्यांची मागणी मंजूर करण्यात आली पण त्यातूनच गांधी व आंबेडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले.
१९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन’ नावाचा पक्ष स्थापन करून अस्पृश्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ तर्फे शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात बहुमूल्य कार्य करण्यात आले.
आंबेडकर यांनी आपल्या स्वातंत्र्यपूर्व राजकीय कारकिर्दीत मजूर मंत्री आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर विधिमंत्री म्हणून कामकाज पाहिले. आंबेडकर स्वतंत्र भारताच्या संविधान समितीचे सभासद झाले. त्यानंतर ते संविधान लेखन समितीचे अध्यक्ष झाले. सुमारे तीन वर्षांच्या मेहनतीनंतर संविधानाचा मसुदा तयार केला.
आंबेडकर स्वतः उत्तम वाचक आणि लेखक होते. त्यांचे राजकीय भाष्य नेहमी विचारात घेतले जात होते. त्यांच्याकडे सुमारे २५००० दुर्मिळ ग्रंथ होते. त्या ग्रंथांचा नेहमी अभ्यास आणि चिंतन ते करत असत. त्यांनी संस्कृत भाषा जिद्दीने शिकून घेतली आणि पुरातन भारतीय ग्रंथ वाचून काढले.
अस्पृश्यांच्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले होते. सर्व धर्मांचा गाढा अभ्यास करूनच त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण अंगिकारली. आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रसार आणि मानवी मुल्यांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचा बौध्द धर्मावर आधारित “कालोचित रहस्य” हा भाष्यग्रंथ प्रसिध्द आहे. संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि पीडितांच्या प्रश्नांसाठी लढणारा हा महामानव ६ डिसेंबर १९५६ रोजी अनंतात विलीन झाला.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध (Dr. Bababsaheb Ambedkar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…