भावनिक निर्णय कधीही भविष्यासाठी फायदेशीर ठरत नाही. एकतर त्या निर्णयानंतर स्वतःचा वेळ वाया जातो किंवा निर्णयाचा उद्देश्य देखील साध्य होत नाही. त्यामुळे जेव्हा भावना शांत असतात तेव्हा बुद्धीने स्वतःच्या निर्णयावर व्यवस्थित विचार करायचा असतो. हा सराव वारंवार असल्यास तुम्ही वास्तविक निर्णय आणि भावनिक निर्णय यामधील फरक करू शकाल.
उदाहरण स्वतःचेच अनुभवा! जेव्हा कधी अचानक आपण उर्जावान अनुभव करत असू तेव्हा भावना खूप उचंबळून येत असतात. तेव्हा आपण कोणाला वचन देतो किंवा स्वतःबद्दल निर्णय घेतो. त्यानंतर ती वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करत बसतो कारण त्या परिस्थितीशी आपला काही एक संबंध नसतो आणि आपण पुरते अडकलेलो असतो.
आपले विचारच आपली दिशा ठरवू शकतात आणि त्यानुसार भावना प्रदीप्त होत असतात, परंतु सर्वांगीण विचार करण्याइतपत समज आपल्यात नसते आणि आपल्याला झटपट निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आयुष्यातील बरेचसे अनुभव हे भावनिक निर्णयामुळे आलेले असतात.
निर्णय हा तुमचाच आहे का ?
भावनिक किंवा वास्तविक याच्याही अगोदर तुम्ही घेतलेला निर्णय स्वतःचा आहे का? हे तपासून पाहा. आपले पालक, मित्र बऱ्यापैकी आपले भविष्य निर्धारित करत असतात. लहानपणी ते योग्य असेल पण मोठे व्हायला सुरुवात झाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. चुकलात तरी चालेल पण निर्णय घ्या. त्यानंतर निर्णयाचा भावनिक की वास्तविक हा प्रकार समजून येईल.
भावनिक किंवा वास्तविक निर्णय कसा ओळखायचा?
त्यासाठी तुम्ही एक प्रयोग करू शकता. वर्षभरात कोणती कामे महत्त्वाची असतील त्याची नोंद ठेवा. त्या ध्येयाच्या किंवा कामांच्या प्रति आजच्या दिवशी काय करता येईल, कोणते छोटे पाऊल उचलता येईल? तशी कृती करा. तशा कृतीने पुढची कृती करण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते सर्व निर्णय वास्तविक असतील.
याविरुद्ध जर तुम्ही नियोजनशून्य असाल तर मात्र तुमचे निर्णय हे इतरांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर आधारित असतील. तुम्ही भावना मय झालात तर निर्णयाचा फायदा होत नाहीच शिवाय नुकसान होण्याच्या शक्यता जास्त असतात. परिणामी दुःख आल्यावर तुम्ही इतरांनाच जबाबदार ठरवता.
भावनिक असावे की नसावे?
व्यक्ती भावनिक असल्याशिवाय वास्तविक निर्णय घेऊच शकत नाही. तोच व्यक्ती व्यवस्थितरीत्या सर्वांची काळजी करून आणि समाजाचे भले पाहून स्वतःची दिशा ठरवत असतो. त्यामुळे भावनिक असणे चांगले आहे परंतु महत्त्वाचे निर्णय भावनिक दशेत असताना घेऊ नका.
स्वतःचे काम वेगळे आणि घरची नाती, इतर मैत्रीचे, स्नेहाचे संबंध वेगळे! स्वतःच्या कामात एकदम वास्तविक परिस्थिती पाहून, फायदा – तोटा सर्वांचा विचार करून काम करत राहा. काम नसताना मात्र एकदम मैत्रीपूर्ण व भावनिक असलात तरी चालेल.
माणूस विचार, भावना, मन, बुद्धी, शरीर अशा सर्वांचा मेळ आहे. स्वतःचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर या सर्व दिशांचा विचार झालाच पाहिजे. कुठल्याच एका दिशेला जर झुकते माप दिले तर माणूस फसू शकतो. त्यातून बाहेर पडण्यास वेळ आणि ऊर्जाही खर्च होते.
तुम्हाला भावनिक निर्णय विरूध्द वास्तविक निर्णय हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये कळवा… धन्यवाद!